नांदेड – धर्माबाद तालुक्यातील पाटोदा ( बु.) येथील तक्रारदारास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अहिल्याबाई सिंचन विहीर योजने अंतर्गत विहीर मंजूरीच्या प्रस्ताव मंजुर करण्यासाठी धर्माबाद पंचायत समितीच्या महिला तांत्रिक सहायकास सहा हजार रुपयांची लाच घेतांना पतीसह लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना दि.७ मार्च रोजी घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (बु.) येथील तक्रारदार यांचे गट क्र.४४४ मध्ये एक एकर शेतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अहिल्याबाई सिंचन विहीर योजने अंतर्गत विहीर मंजूरीचा प्रस्ताव दि. ०८/०१/२०२४ रोजी पंचायत समिती धर्माबाद येथे दाखल केला होता.
पंचायत समितीच्या सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवून टिपणी तयार करून आरोपी तांत्रिक सहायक श्रीमती प्रियंका लोहगावकर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी दिली. तक्रारदार यांनी तांत्रिक सहायक प्रियंका लोहगावकर यांचे कडे सिंचन विहीरीचे कामासंबंधाने चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांनी तक्रारदार यांना ८ हजार रुपयांची मागणी केली. सदरची रक्कम ही लाच असल्याचे तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली.
दि. ७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदारास लाच मागणीपडताळणीसाठी पाठविले असता,आरोपी लोकसेवक तांत्रिक सहायक श्रीमती प्रियंका लोहगावकर यांनी पंचासमक्ष ८ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ६ हजार रूपये स्विकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार आरोपी तांत्रिक सहायक प्रियंका लोहगावकर यांनी पंचायत समिती कार्यालय येथे पंचासमक्ष ६ हजार रुपये लाच स्विकारून त्यांचे पती मकरंद काळेवार यांच्याकडे दिले. नांदेडच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने लाच रक्कम ६ हजार रुपये त्यांचे पती मकरंद काळेवार यांच्याकडून पंचासमक्ष जप्त केली.आलोसे चे पती खाजगी इसम यांनी लाचेची रक्कम आलोसे यांच्याकडून स्विकारून लाच घेण्यास प्रोत्साहन दिले.
त्यामुळे आरोपी लोकसेवक प्रियंका लोहगावकर, तांत्रिक सहायक व त्यांचे पती मकरंद काळेवार यांना ताब्यात घेण्यात आले असुन धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई लाचलुचपत विभागाचे नांदेड परीक्षेत्र जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे,पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील,पोलीस निरीक्षक कालीदास ढवळे, सपोउपनि गजेंद्र मांजरमकर, पोलीस कर्मचारी शेख रसुल,मेनका पवार,मारोती सोनटक्के यांनी केली आहे.