- राज्यातील तरुणांना धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन बदबाद करण्याचे महायुतीचे सरकारचे पाप…
- ब्लॅकलिस्टेड BVG कंपनीलाच पुन्हा ऍम्ब्युलन्सचे कंत्राट, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोघांचा सहभाग…
मुंबई – पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे.
मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे काम करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात अंमलीपदार्थांचा काळा धंदा जोरात सुरु आहे. याआधी नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, सोलापूर मध्येही अंमलीपदार्थांचे मोठे साठे सापडले होते. पोलिसांनी थातूर मातूर कारवाई केली, ड्रग माफिया मात्र मोकाटच राहिले म्हणूनच पुण्यात ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तर धिंडवडेच निघाले आहेत. विधानसभेत राज्याचा एक वरिष्ठ मंत्रीच त्यांना धमक्या येत असल्याचे सांगतात यावरून कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे लक्षात येते. हे सरकार भ्रष्ट असून फक्त तिजोरी लुटण्यात व्यस्त आहे.
ब्लॅकलिस्टेड BVG कंपनीलाच पुन्हा ऍम्ब्युलन्सचे कंत्राट..
ऍम्ब्युलन्स सेवा पुरवणाऱ्या BVG कंपनीला देशभरातील ७ राज्यांनी ब्लॅकलिस्ट केले आहे, या कंपनीला काम देऊ नये असे आदेश आहेत. BVG कडे जुन्या व कालबाह्य झालेल्या ऍम्ब्युलन्स आहेत. कोरोना काळात या कंपनीला मुदतवाढ दिली होती, त्यानंतर नवीन टेंडर काढून दुसऱ्या कंपनीला कंत्राट द्यायला पाहिजे होते परंतु महायुती सरकारने पुन्हा BVG ह्याच कंपनीला कंत्राट दिले आहे.
BVG कंपनीवर एवढी मेहरबानी दाखवायला या कंपनीचा मालक काय सरकारचा जावई आहे का? असा प्रश्न विचारत या ब्लॅकलिस्टेड कंपनीला कंत्राट देण्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोन लोकांचा सहभाग आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे