Friday, November 22, 2024
Homeराज्यआंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी!: नाना पटोले...

आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी!: नाना पटोले…

अत्याचारी मोदी सरकारला शेतकरीच सत्तेवरून खाली खेचणार!

काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर शेतमालाच्या हमी भावाचा कायदा करणार.

मुंबई – शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही मोदी सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत.

शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेले नाही उलट शेतकरी देशोधडीला लागला आहे. दोन वर्षापूर्वी लाखो शेतकऱ्यांनी तीन काळ्या कायद्याविरोधात वर्षभर तीव्र आंदोलन केले होते.

या आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरिही निर्ढावलेल्या, गेंड्याच्या कातडीच्या हुकूमशाही सरकारने शेतकऱ्यांचा वर्षभर छळ केला. खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलजीवी म्हणून अपमान केला. शेवटी निवडणुकीच्या तोंडावर सरकार नमले व काळे कायदे रद्द केले पण शेतमालाला हमी भाव देण्याचा कायदा मात्र अद्याप केला नाही, याच मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.

मोदी सरकारने या शेतकऱ्यांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या, त्यांची धरपकड सुरु केली आहे. दिल्लीच्या तीन्ही सीमांवर पोलिसांबरोबरच निमलष्करी दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. शेतकरी देशाचा नागरिक नाही का? आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत येण्यापासून त्यांना रोखण्याचे कारण काय? आणि शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमीपणा वाटतो का? १० वर्षापासून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अत्याचार केले आहेत.

शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेती साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. शेतकरी सन्मान योजनेखाली शेतकऱ्यांचा अपमानच केला जात आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या भाजपा सरकारला हा शेतकरीच सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही.

काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेसने देशभर आंदोलने केली. खा. राहुल गांधी यांनी स्वतः या आंदोलनात सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांनी आता केलेल्या मागण्यांनाही काँग्रेसचा पाठिंबा आहे. काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आला तर हमी भावाचा कायदा करण्याचे आश्वासनही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व खा. राहुल गांधी यांनी जाहीरपणे दिले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: