अकोला – संतोषकुमार गवई
अकोला जिल्ह्यातील सर्व औदयोगिक वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्यासाठी विद्युत भवन अकोला येथे जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र ‘स्वागत सेल’ सुरू करण्यात आले आहे.एम.एस.ई.बी. सूत्रधारी कंपनिचे स्वंतत्र संचालक श्री.आशिष चंदाराणा यांच्या हस्ते या सेलचे आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर,अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट,अनिल वाकोडे, इंडस्ट्रीयल असोशिएशन अकोला चे अध्यक्ष उन्मेश मालू,सचिव नितिन बियाणी,विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अकोलाचे अध्यक्ष निकेश गुप्ता,सचिव निरव बोरा,लघु उद्योग भारती अध्यक्ष पंकज बियाणी,सचिव अमित सराफ यांच्यासह उद्योजक व औद्योगिक संघटना प्रतिनिधींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना स्वतंत्र संचालक आशिष चंदाराणा म्हणाले की, राज्याचे ऊर्जामंत्री मा.श्री.देवंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून उद्योजकांना अधिक तत्पर सेवा देण्यासाठी ‘ स्वागत सेल’ ची निर्मिती राज्यातील सर्वच जिल्ह्यात करण्यात आली आहे. अकोल्यातील उद्योजकांना कायम उत्तम सेवा देण्याचा महावितरणच्या प्रयत्नाबद्दल यावेळी त्यांनी कौतूक केले.पुढे बोलतांना ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या दुरदृष्टितून राज्यात २०३५ पर्यंतचे ४५००० मेगा वॅट वीज निर्मिती,पारेषण आणि वितरणाचे नियोजन करण्यात आले असुन येत्या एप्रिल महिन्यापर्यंत त्याबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे.
महावितरणच्या महसुलाचा औद्योगिक ग्राहक प्रमुख स्रोत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील या सर्व ग्राहकांना ‘स्वागत सेल’ च्या माध्यमातून डोअर स्टेप सेवा देण्यासाठी महावितरणचे पूर्ण प्रयत्न राहणार आहे. ‘स्वागत सेल’मुळे औद्योगिक ग्राहकांना विजसेवा व तक्रारींसाठी स्थानिक कार्यालयाऐवजी आता थेट मंडल स्तरावर संपर्क साधता येणार असल्याचे यावेळी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी सांगीतले. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी स्वागत सेलबाबत व त्याच्या कार्यपध्दतीबाबत सविस्तर माहिती दिली.
‘स्वागत सेल’ साठी संपर्क :-
जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्वागत सेल’ ला संपर्क करण्यासाठी औद्योगिक वीज ग्राहकांनी [email protected] ईमेल आय डी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
स्वागत सेल ची कार्यपध्दती :-
‘स्वागत सेल’ चे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता प्रशासन काम पाहणार आहे. ईमेल आयडीच्या माध्यमातून या सेलकडे संपर्क साधल्यानंतर औद्योगिक ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येईल. तसेच नवीन वीजजोडणी, भार वाढ व इतर सेवा देण्यासाठी थेट ग्राहक दारी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विनाविलंब सेवा दिली जाणार आहे.
अकोल्यात बातम्या जाहिराती साठी संतोषकुमार गवई – ९६८९१४२९७३