Rajyasabha Election : होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेससह शिवसेना आणि भाजप पक्ष मैदानात उतरले असून कॉंग्रेसच्या वतीने माजी राज्यमंत्री चंद्रकांत हंडोरे याचं नाव उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने सुद्धा राज्यसभेच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत.
यामध्ये काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी तसेच नांदेड येथील भाजपचे जुने कार्यकर्ते डॉ. अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. तर नारायण राणे गेल्या सहा वर्षापासून विरोधीपक्षावर आगपाखड करून सुद्धा त्यांची उमेदवारी नाकारल्या गेली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कालच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्याचवेळी त्यांना राज्यसभेचे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशोक चव्हाण यांचे नाव राज्यसभेचे उमेदवारीच्या यादीत समोर आले आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा एक मोठा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना आगामी मंत्रिमंडळात मोदी सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात येईल, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.