- शहरातील पथदिवे बंद होण्याची शक्यता
- ३ कोटी ९५ लाखाचे चालू वीजबिल थकीत
- महावितरणला नाईलाजास्तव करावी लागणार कटू कारवाई
अमरावती – शहरातील पथदिव्यांचे ३ कोटी ९५ लाख रूपयाचे चालू वीज वीजबिल भरण्याला महानगरपालिका प्रशासनाकडूंन प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणकडून पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडे पथदिव्याचे सप्टेंबर महिन्याचे १ कोटी ७ लाख,ऑक्टोबर महिन्याचे ९२ लाख,नोव्हेंबर महिन्याचे ९४ लाख आणि डिसेंबर महिन्याचे १ कोटी २ लाख रूपये वीज बिलाचे थकले आहे. शहर अंधारात जाणार नाही,तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जाणीव ठेवत महावितरण शहर विभागाकडून पथदिव्यांचे वीजबिल भरण्याबाबत वारंवार आवाहन आणि आठ वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
परंतू महानगरपालिका प्रशासनांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई होण्याची शक्यता आहे.वीज पुरवठा खंडित केल्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहणार आहे.याबाबत महावितरणकडून जिल्हाधिकारी,तसेच पोलीस आयुक्त कार्यालयास माहिती देण्यात आली आहे.
महावितरण वीज ग्राहकात भेदभाव करीत नाही.तसेच वीज ग्राहकांनी प्रत्येक महिन्यात वेळेत वीजबिलाचा भरणा करणे क्रमप्राप्त आहे. वीजबिलाच्या वसुलीवरच महावितरणचा आर्थिक गाडा चालत असल्याने, वीजबिलाच्या वसुलीसाठी वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा महावितरणकडून विद्युत कायदा २००३ कलम ५६(१) नुसार वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे महावितरणच्या कारवाईपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने त्वरीत थकीत वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.