पुणे – गणेश तळेकर
चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत नटराज, घंटेचे पूजन करून करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदि मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती. यावेळी बोलताना संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार यांनी “वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, घरकुल योजना करावी, नाट्यगृहाच्या भाड्याबाबतीत विचार करावा, यांसाठी विशेष अनुदान देण्यात यावे असा प्रस्ताव मांडला.
शंभरावे संमेलन दोन वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु, करोनामुळे झाले नाही. कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे. आणि१०० व्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले, अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
आम्ही कलाकार तीन तास अभिनय करतो. पण २४ तास अभिनय करणारी मंडळी मंचावर आहे, बसणारे ते ३६५ दिवस अभिनय करत असतात. तसेच नाट्य परिषद अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय अशी मिश्कील टिप्पणी प्रशांत दामले यांनी यावेळी केली. नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केलं पाहिजे. निधी वाटप व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. महत्वाची जबाबदारी प्रेक्षकांची आहे, त्यांनी पुढच्या पिढीला नाटक बघण्याची सवय लावली पाहिजे. असे प्रतिपदान प्रशांत दामले यांनी यावेळी केले
नाट्यगृहांचा प्रश्न हल्ली सातत्याने मांडला जातो. नाट्यगृह बांधतानाच काही गोष्टींचा विचार परिषद आणि शासनकर्त्यांनी करायला हवा.असं सांगताना अजित भुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं . यावेळी बोलताना ते म्हणाले की उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. नाट्यव्यवसायाला उद्योगाचं रूप कसं देता येईल ह्यासाठी ते सतत कार्यरत असतात.
सांस्कृतिक कार्यमंत्री श्री मुनगंटीवार ह्यांच्या रुपाने आम्हाला एक नाट्यप्रिय रसिक लाभला आहे जो संपूर्ण कलाक्षेत्रातील कलाकारांना उत्तेजन देत असतो. उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार ह्यांनी अर्थमंत्री ह्या भूमिकेत जास्तीत जास्त निधी ह्या संमेलनाासाठी उपलब्ध करून दिला आहे. आजचे उद्घाटक मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच मराठी नाटक प्रगतीपथावर राहावं ह्यासाठी मदत करायला उत्सुक असतात.
कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो. जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल. शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत माजी संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केला.
१०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल म्हणाले, माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक दिग्गजांचे योगदान आहे. नाट्यसृष्टीचे अनेक प्रश्न आहेत. आज प्रामुख्याने मी नाटकात येऊ इच्छित असलेल्या मुलांसाठीचा महत्त्वपूर्ण विषय मांडत आहे. राज्याच्या प्रत्येक विद्यापिठात नाट्य विभाग आहे मात्र त्यांना त्यासाठीचा खर्च त्यांनीच उभा करायचा आहे, हा खर्च ५ ते ७ कोटी रुपयांचा आहे, प्रत्येक विद्यापीठाला तो झेपणारा नाही यामुळे राज्य सरकारने प्रत्येक विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान दिले पाहिजे. तसेच इथे सादर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉरशिप लावू नये असे सांगितले.
नाट्य दिंडीने दुमदुमली पिंपरी चिंचवडकरांची सकाळ सनई चौघड्यांचा मंगलमयी स्वर…लेझीम, ढोलताशांचा गजर… रांगोळ्या, पायघड्या, झब्बा-धोतर, नऊवारी साडी, फेटा असा मराठमोळा पेहराव केलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या साथीने मोरया गोसावी मंदिरा पासून शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्य दिंडीला सुरूवात झाली.
गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोहोचली.नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती.
नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, संदीप पाठक, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, शुभांगी गोखले, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, कांचन अधिकारी, निर्मिती सावंत,अमृता सुभाष,प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच सुशांत शेलार, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले.