कोगनोळी – राहुल मेस्त्री
राज्यस्थान येथील खुनाच्या गुन्हयातील कुख्यात टोळीला कोगनोळी ता.निपाणी येथील टोलवरून कागल पोलीस आणि कोल्हापूर एलसीबी यांच्या संयुक्त पथकाने गुरुवार दि.8 रोजी सांयकाळी ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की राजस्थान येथील खुनाच्या गुन्हयातील कुख्यात टोळी चारचाकी गाडीतुन गाडी क्र. (एम पी ०९ सी क्यु ३७२४) कोल्हापूरच्या दिशेने गोव्याला जात असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाल्यावर त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, वडगाव पोलीस ठाणे आणि कागल पोलीस ठाणे याना माहिती देऊन तात्काळ नाका बंदी करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्यासह सहा पोलीस निरीक्षकांनी पुणे बंगलोर महामार्गावर पेट्रोलिंग सुरू करत कागलच्या दिशेने येणाऱ्या टोळीचा पाठलाग केला तर कागलचे पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव यांनी आपला फौजफाटा घेऊन कोगनोळी टोलवर नाकाबंदी करून प्रत्येक वाहनांची तपासणी करून सदर राजस्थान मधील खुनाच्या गुन्हयातील कुख्यात टोळीला गोव्याला जात असताना सापळा रचून कागल पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाख (एलसीबी) यांनी संयुक्त कारवाई करून त्या टोळीस ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यात आणले.
त्याचेकडे चौकशी केली असता, त्यांनी भरतपुर येथे मथुरा गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कृपालसिंग या इसमाचा जमिनीच्या वादातून गोळया घालुन खुन केल्याची कबुली दिली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असुन ते खुनाचा गुन्हा करुन पळुन गेलेले होते याची खात्री केली. सदरचे आरोपीना ताब्यात घेणे करीता मथुरा गेट पोलीस ठाण्याचे पोलीस पथक रवाना झालेले असुन त्यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे…
कुलदिप कुवरजीत सिंग वय २८, प्रभाव महावीर सिंग वय २१ , राहुल श्रीपरमविर सिंग वय २८, विश्वेंदर बिजदंर सिंग, विजयपाल बिरेंदर सिंग वय २८ अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत.. कारवाईत कागल पोलीस ठाण्यातील अशोक पाटील ,अरुण कांबळे, नेमगोंडा पाटील, विनायक अवताडे ,विजय पाटील, बाळू पटेकर ,रवी साळुंखे, मुनाफ मुल्ला, सुनील पाटील, अनंत कोंढरे प्रभाकर पुजारी, महादेव बिरंजे, मोहन माटुंगे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी हजर होते…