अमरावती – महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अमरावती शहरातील कडबीबाजार आणि भाजीबाजारात महावितरणने विविध ठिकाणी मारलेल्या धाडीत ३२ लाखाच्या वीज चोऱ्या उघड करण्यात आल्या आहेत. खुप मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरणकडून यापुढे नियमित आणि अनपेक्षीत मोहीमा राबविण्यात येणार आहे.
कडबी बाजार आणि भाजीबाजार परिसराला ताज ,चित्रा आणि इमाम नगर फिडरव्दारे वीज पुरवठा करण्यात येतो.या परिसरात वाढलेल्या वीज चोरीमुळे या वाहिन्यांची वीज हानी ही सरासरी ६७ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. तसेच वीज चोरीमुळे यंत्रणा भारीत होऊन शॉर्ट सर्कीट होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास प्रामाणीकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांना होतो आहे.
शिवाय महावितरणला लाखो रूपयाचे नुकसान होत असल्याने यापुढे अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता आनंद काटकर आणि अतीरिक्त कार्यकारी अभियंता संजय कुटे यांच्या नेतृत्वात या भागात दररोज वीज चोरी पकडण्याचे उध्दिष्ट देण्यात आले आहे.
वीज मीटर मध्ये फेरफार तसेच छेडछाड केल्यास महावितरणकडून वीज ग्राहकांवर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. दिनांक १ ते ०८ सप्टेंबर दरम्यान शहरातील भाजीबाजार आणि कडबीबाजार परिसरात मारलेल्या धाडीत ६७ ठिकाणी १ लाख ८१ हजार ९०० युनिटची आणि ३२ लाख रूपयाची वीज चोरी झाल्याचे उघड करण्यात आले आहे.
वीज मीटर मध्ये फेरफार अथवा छेडखानी करणे हा विद्युत विद्युत कायद्यानुसार गुन्हा असून या अंतर्गत संबंधित वीज ग्राहकावर कलम १३५ अन्व्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.तसेच अशा ग्राहकांवर वीज चोरी करण्यात आलेल्या युनिटच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते.प्रति केडब्ल्यूएचपी नुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार रुपये,वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार रुपये तर इतर वर्गवारीतील ग्राहकावर २ हजार रुपये दंडात्मक कारवाई म्हणून तडजोडीचे शुल्क आकारण्यात येतो.
गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.वीज मीटर मध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्या विरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. आठवड्याभऱ्यात पकण्यात आलेल्या वीज चोरीतील १९ वीज चोरांनी थेट मीटरच बायपास केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. याशिवाय मीटरला छीद्र पाडून मीटरमध्ये रोध निर्माण करून मीटरची गती कमी करणे,मीटर खोलून मीटरच्या आतील सर्कीट डीस्टर्ब करण्याचे प्रकारही उघडकीस आले आहे.
फॉल्टी मीटरची तपासणी करण्यात येणार – वीज चोरी पकडण्याच्या भितीने अनेक ग्राहकांनी आपले मीटर जाणीवपूर्व फॉल्टी केल्याचेही निदर्शनास येत आहे.त्यामुळे फॉल्टी मीटर असलेल्या ग्राहकांचेही मीटर तपासण्याची मोहीम हाती घेतली असून वीज चोरी झाल्याचे आढल्यास त्यांच्यावर वीज चोरी अंतर्गत तडजोडीसह वीज चोरीच रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
जनसंपर्क अधिकारी
महावितरण,अमरावती परिमंडळ