IND vs SA : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमधील तीन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका नुकतीच संपली आहे. ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर दोन्ही देश तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आमनेसामने येतील. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही देशांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेला मोहम्मद शमी 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. याशिवाय एकदिवसीय मालिकेसाठी संघाचा भाग असलेल्या दीपक चहरने या मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे.
बीसीसीआयने आफ्रिकन दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली तेव्हा मोहम्मद शमीचा कसोटी मालिकेतील सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, मोहम्मद शमी वेळेत तंदुरुस्त होऊ शकला नसल्याने तो मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मंजुरी दिलेली नाही. मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत झाली असून ती अद्याप बरी झालेली नाही.
दीपक चहरही झाला बाहेर
बीसीसीआयने नुकत्याच जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दिपक चहरने कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे आगामी एकदिवसीय मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. दीपक चहरच्या जागी आकाश दीपचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर श्रेयस अय्यर कसोटी संघात सामील होणार असून तो मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. अय्यर कसोटी मालिकेची तयारी करणार आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप हे कसोटी संघात सामील होतील आणि आंतर-संघ सामने आणि कसोटी मालिकेसाठी संघाच्या तयारीवर देखरेख करतील. संघाला एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ कोचिंग स्टाफ मदत करेल ज्यात फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक राजीव दत्ता आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा यांचा समावेश आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल, तर दुसरा सामना 19 डिसेंबर रोजी गेकेबरहा येथे आणि तिसरा सामना 21 डिसेंबर रोजी पार्ल येथे खेळवला जाईल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून तर दुसरा सामना 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
भारत वनडे टीम: ऋतुराज गायकवाड़, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कप्तान) (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल. मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, आकाश दीप