नांदेड – महेंद्र गायकवाड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत पैनगंगा, पूर्णा व उनकेश्वर उच्चपातळी बंधाऱ्या संदर्भात नागपूर शहरातील हैद्राबाद हाऊस प्रशासकीय इमारतीमध्ये मुख्य सचिव दिपक कपुर यांच्या कक्षात बुधवारी (दि.१३) बैठक पार पडली.
या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैनगंगा, पूर्णा व उनकेश्वर नदीवरील उच्चपातळी बंधाऱ्याच्या निविदा प्रक्रियेसाठी येत्या महिनाभरात भुसंपादन करण्याचे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आदेश दिल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील प्रमुख जीवनवाहिनी पैनगंगा नदीच्या काठावरील शेती आणि गावांना बारमाही मुबलक पाणी मिळाले पाहिजे. या उद्देशाने खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सरकारने पैनगंगा, पूर्णा व उनकेश्वर उच्चपातळी बंधाऱ्यास मान्यता दिली आहे.
या बंधाऱ्यांच्या निविदा प्रक्रियेस लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी. यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने घेतलेल्या बैठकीस राज्याच्या जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, श्री.नार्वेकर, श्री.बेलसरे, ई.डी.तिरमनवार, चिफ इंजिनिअर श्री.गवई, कार्यकारी अभियंता श्री कचकलवार यांची उपस्थिती होती.
या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी नांदेड, हिंगोली व यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांनी भूसंपादनाचे आदेश दिले आहेत. या तीन्ही नदीवर बंधारे झाल्यास हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत ऊर्ध्व पैनगंगा व पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यतेसह सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
या बंधाऱ्यांची कामे अधिक गतीने पूर्ण व्हावीत यासाठी वरील बंधाऱ्यांचा मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात समावेश करण्यासाठी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंजुरी देऊन पैनगंगा व पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांचा समावेश मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात करण्यात आला आहे.
आता ऊर्ध्व पैनगंगा, पूर्णा, उनकेश्वर प्रकल्पातील उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया तातडीने होणे गरजेचे असल्यामुळे येत्या आठ दिवसात निविदा प्रक्रियेला मान्यता देण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी अपर मुख्य सचिव दिपक कपूर यांच्याकडे केली आहे.
पेनगंगा नदीवरील या उच्चपातळी बंधाऱ्यासाठी भुसंपादन होणार
हदगाव येथील गोजेगाव बंधारा, माहुर तालुक्यातील धनोडा, किनवट, किनवट तालुक्यातील मारेगाव, हदगाव तालुक्यातील पांगरी (साप्ती), बनचिंचोली, हिमायतनगर तालुक्यातील घारापूर येथे होणाऱ्या उच्च पातळी बंधाऱ्यास लागणाऱ्या जमिनीसाठी भुसंपादन करण्यात येणार आहे.