हेमंत जाधव
धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात वारकर्यांनी धारकरी बनून कार्य करावे ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी
आळंदी (जिल्हा पुणे) – केवळ भारतात नव्हे, तर जागतिक स्तरावर आज हिंदु धर्म, हिंदुत्व यांवर आघात होत आहेत. बुलढाणा, नंदूरबार, गडचिरोली येथे धर्मांतराने वेग धरला असून आळंदी येथे हिंदु कुटुंबास फसवून ख्रिश्चन करण्याचे प्रयत्न झाले याचा अर्थ हे संकट आपल्या दारापर्यंत आले..!
नक्षलवाद, इस्लामी दहशतवाद यांची गंभीर समस्या आपल्यासमोर आहे. संतांनाही जातीत विभागण्याचे षडयंत्र चालू आहेत. ‘गजवा ए हिंद’चे मोठे संकट आपल्यासमोर असून ‘सीमी’ ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या संघटना देश पोखरत आहेत. त्यामुळे हिंदु धर्मावर असलेली विविध संकटे दूर करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला धर्मकार्य करावे लागले आणि धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात वारकर्यांना धारकरी बनावे लागेल, असे आवाहन माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
9 डिसेंबर 2023 या दिवशी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे 17 व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ‘राष्ट्रासमोरील संकटे’ या विषयावर ते बोलत होते. या अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांवर होत असलेल्या अन्यायाविषयी आणि विविध कथित गुन्ह्यांखाली जे जे अटकेत आहेत त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा निर्धार सर्वांनी एकमुखाने केला याला हात उंचावून सर्वांनी समर्थन दिले. या अधिवेशनासाठी 500 हून अधिक वारकर्यांची उपस्थिती होती.
हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात नामवंत संत- महंत, मान्यवर, ह.भ.प., धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल’ उत्पादने विकत घेणार नाही असा निर्धार केला.
प्रास्ताविक देविदास धर्मशाळेचे ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी केले. या प्रसंगी धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी अधिवेशनात मांडण्यात आलेले ठराव तात्काळ शासन दरबारी पोचवून त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या पाठिशी ठामपणे उभे रहाण्याचा वारकरी संप्रदायाचा निर्णय कौतुकास्पद ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘आजही 18 लाख 15 सहस्र हिंदूंचे धर्मांतर होते, तसेच हिंदु धर्मावर होणारे आघात वाढतच असून राजकीयदृष्ट्या जरी अनुकुल वातावरण दिसत असले, तरी धर्माच्या दृष्टीने अजून अनुकूल परिस्थिती आलेली नाही.
सनातन धर्माविषयी ‘हेट स्पीच’द्वारे गरळ ओकणारे साम्यवादी उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे, जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात सरकारने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. याचसमवेत हिंदु धर्म विरोधकांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला ‘सनातन धर्मरक्षक’ बनावे लागेल. कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्यांच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधकांच्या आणि हिंदुत्वनिष्ठांच्या ज्या अटक झाल्या आहेत त्या अन्याय्य असून या अधिवेशनाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाने ठामपणे हिंदुत्वनिष्ठांच्या पाठिशी ठामपणे उभे रहाण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे.’’
या प्रसंगी ब्रिगेडिअर हेमंत महाजन ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि आव्हाने’ यावर बोलतांना म्हणाले, ‘‘वर्ष 2014 पासून आपल्यासमोर संकटे अल्प झाली; मात्र संकटे संपलेली नाहीत ! जो पर्यंत पाकिस्तान देश अस्तित्वात असेल तोपर्यंत काश्मीरचे संकट संपणार नाही.
अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून अराजकता माजवून जातीय दंगली भडकवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आता दंगलींचे लोण गावापर्यंत पोचले आहे. बांगलादेशी घुसखोर्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून अर्बन नक्षलवाद, माओवाद, अंतर्गत घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चीनने मोठ्या प्रमाणात आर्थिक घुसखोरी केली आहे. त्यामुळे हिंदु धर्मावर असलेली संकटे गंभीर असून प्रत्येक नागरिकाला एक सैनिक बनून आता कार्य करावे लागेल.
उपस्थित मान्यवर – पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. जय महाराज, ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे शास्री, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर आणि पुणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अर्जुन महाराज रासकर, स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. सुभाष महाराज शिंदे, ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे, ह.भ.प. गोपाळ महाराज वक्ते, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनात करण्यात आलेले विविध ठराव ! – गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य टिकवण्यासाठी तीर्थक्षेत्र परिसरात मद्य आणि मांस यांवर बंदी व्हावी, पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी येथे नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, ज्ञानेश्वरी, अभंग, गाथा, रामायण, महाभारत यांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा, सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारमुक्त करून भक्तांच्या ताब्यात देण्यात यावीत, नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा श्री कानिफनाथ देवस्थानात कीर्तन करणार्या वारकर्यांना मारहाण करणार्या धर्मांधांच्या विरोधात केवळ कारवाई न करता त्यांचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, जादूटोणाविरोधी कायदा कायमस्वरूपी रहित करावा आणि या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी समितीच्या सहअध्यक्ष पदावरून शाम मानव यांची तात्काळ हकालपट्टी करावी, यांसह अन्य 17 विविध ठराव करण्यात आले.
मान्यवरांचे मनोगत – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ महाराज म्हणाले, ‘‘पंतप्रधान पोषण आहार योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात ‘अंड्या’चा समावेश केला आहे. या निर्णयास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध असून शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.’’ स्वामी भारतानंद सरस्वती महाराज म्हणाले, ‘‘सज्जन शक्ती मौन असल्याने आज देशविरोधी कारवाया वाढत आहेत. साधू-संत, तसेच धर्म कार्य करणार्या सनातन संस्थेच्या साधकांनाही अटकेला सामोरे जावे लागले आहे.
२ वर्षांपूर्वी पालघर येते साधूंची हत्या झाल्यानंतर मी सन्यास घेऊन धर्मांतराच्या विरोधात कार्य करत आहेत. या सर्व समस्यांवर भारत हिंदु राष्ट्र घोषित होणे हाच उपाय आहे.’’ ह.भ.प. तुणतुणे महाराज म्हणाले, ‘‘अनेक ठिकाणी हिंदूंच हिंदु धर्माच्या विरोधात उभे रहातात हे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्यावेळी अनुभवले आहे. त्यामुळे यापुढे वारकर्यांना नेभळट राहून चालणार नाही, तर धर्माच्या रक्षणासाठी सजग रहावे लागणार आहे. ‘संघे शक्ती कालौयुगे’ या उक्तीप्रमाणे समस्त हिंदूंनी सध्या संघटित रहायला हवे.’’पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) महाराज म्हणाले, ‘‘प्रभू श्रीराम यांच्याकाळापासून राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असे त्यामुळे सर्व सुस्थितीत असे. आज अशी स्थिती नसल्याने अनेक समस्या आहेत. त्यासाठी आपल्याला जागृती करण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरापर्यंत गोहत्याबंदी, लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा, इंद्रायणी स्वच्छता या सर्व गोष्टींच्या संदर्भात सक्रिय व्हावे लागेल.
या प्रसंगी रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘लव्ह जिहाद’ची भयावहता सर्वांसमोर मांडून ‘लव्ह जिहाद’ कायद्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदीच्या विश्वस्तपदी निवड झाल्याविषयी ह.भ.प. निरंजननाथजी महाराज, तसेच धर्मकार्याविषयी स्वामी भारतानंद सरस्वती महाराज आणि ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांचा, तसेच पंडित मनोज शर्मा यांचा ‘धर्मगुरु’ अशी पदवी मिळाल्याविषयी दंडी स्वामिजींच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी ‘हलाल जिहाद’विषयी सविस्तर माहिती दिली, यानंतर ठरावाचे वाचन करून पसायदानाने अधिवेशनाची सांगता झाली.