न्युज डेस्क – आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस असून या संपूर्ण भारतीयांसाठी दुखाचा दिवस ओळखल्या जाते कारण याच दिवशी विश्वनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले होते. येणाऱ्या दिवसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अंतयात्रा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर ‘महापरिनिर्वाण’ नावाचा चित्रपट समस्त भारतीयांच्या भेटीला येणार आहे. ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काय आहे या चित्रपटात यासाठी अनेकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
या चित्रपटाचे नायक अभिनेता प्रसाद ओक यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेयर केली… “माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय.” असे म्हणत अभिनेता प्रसाद ओक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना आणि घटनांचा उलगडा करणाऱ्या श्री. नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारली आहे.
त्यांच्यासोबत अभिनेता गौरव मोरेही दिसत आहे. मात्र त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे चित्रपट आल्यावरच कळेल. याव्यतिरिक्त या चित्रपटात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे.
‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत, विजय निकम, हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी केलं आहे. तर निर्माती सुनील शेळके आणि सहनिर्माते आशिष ढोले आहेत.
संगीतकार विजय गावंडे असून गुरु ठाकूर यांनी सिनेमाला गीत दिलं आहे. अमर कांबळे यांनी ‘महापरिनिर्वाण’चे छायाचित्रीकरण केले आहे. तसेच या चित्रपटाचे वेशभूषाकार चंद्रकांत सोनावणे आणि कलादिग्दर्शक नितेश नांदगांवकर आहेत.