अमरावती : शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अतर्गत येणाऱ्या बेनाम चौकात काल बुधवारी दुपारी एका २२ वर्षीय तरुणाची चोघांनी मिळून हत्या केल्याची घटना घडली. अतुल श्रीराम खोडे वय 22, रा. चिचफैल, अमरावती असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून अतुल हा रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या महिलेला गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून यातील चार आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर पाटील आणि त्यांच्या पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद होते, दोघेही वेगळे राहत होते. मात्र पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने महिलेच्या पतीनेच अतुल खोडे याचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक केली आहे. संतोष चव्हाण ,किशोर वहाणे, शैलेश वहाणे, सुरज पाटील असे अटक केलेल्या आरोपींचे नाव असून मुख्य आरोपी मयूर पाटील अद्यापही फरार आहे.
घटनेच्या दिवशी काय घडल?…
कौटुंबिक वादामुळे मयूर पाटील आणि त्यांची पत्नी अनेक दिवसांपासून वेगळे राहत होते. घटस्फोटाबाबत न्यायालयात खटला सुरू होता. मंगळवारी रात्री मयूर आणि त्याच्या पत्नीमध्ये फोनवरून जोरदार वाद झाला. त्यानंतर पत्नीने बुधवारी सकाळी बडनेरा पोलिस ठाण्यात जाऊन पती मयूरविरोधात तक्रार दाखल केली. याचा राग मानत ठेवून आरोपी मयूर पाटील, त्याचे साथीदार किशोर वहाणे, मंजू शेंडे, संतोष चव्हाण, शैलेश वहाणे यांनी बेनाम चौकात अतुलचा रस्ता अडवला. यावेळी आरोपीने अतुलला आधी धप्पड लगावली. त्यानंतर किशोरने चाकू काढून मयूरला दिला आणि मयूरने अतुलच्या पायावर चार वार केले. यातच अतुल गंभीररीत्या जखमी होऊन धाराशायी झाला. सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी अतुलला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दीड वर्षापासून अतुल ड्रायव्हर म्हणून नोकरीला होता
चिचफैल येथे राहणारा अतुल श्रीराम खोडे हा गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या मयूर पाटील याच्या पत्नीकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. कारमध्ये काही बिघाड झाल्याने त्याने कार दुरुस्तीसाठी बडनेरा येथील गॅरेजमध्ये ठेवण्यात आली होती. बुधवारी दुपारी 1.30 वाजता अतुल खोडे हा त्याचा मित्र अमर मेश्राम याच्यासोबत दुचाकीने बडनेरा येथे कार घेण्यासाठी जात होता. त्यानंतर आरोपींनी बेनम चौकात रस्ता अडवून त्याचा खून केला. घटनेचा अधिक तपास राजापेठ पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सीमा दाताळकर आणि त्यांची टीम करीत आहे.