Batla House : बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणात साकेत न्यायालयाने दोषी ठरवलेला दहशतवादी अरिज खान याच्या फाशीच्या शिक्षेबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने आज आपला निकाल जाहीर केला. दिल्ली उच्च न्यायालयाने अरिज खानला सुनावलेल्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी ट्रायल कोर्टाने खानला फाशीची शिक्षा सुनावली होती.
13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला होता, तर 133 जण जखमी झाले होते. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे दिल्ली पोलिसांना तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांना 19 सप्टेंबर रोजी जामिया नगर येथील बाटला हाऊसमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती.
दिल्लीचे पोलिस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथक जेव्हा दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा पोलिसांच्या पथकावर गोळीबार करण्यात आला. इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि ते शहीद झाले. या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले. इतर दहशतवादी अरिज खान उर्फ जुनैद आणि शहजाद अहमद उर्फ पप्पू फरार झाले होते आणि नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती.