- काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात सरकारवर संतापले…
- ट्रिपल इंजिन सरकार विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष…
नाशिक : विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर तोल कशाचा घेता असा संतापजनक सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
थोरात म्हणाले, नाशिक मुंबई महामार्गाची परिस्थिती वाईट आहे. अडीच तासांच्या प्रवासाला चार ते साडेचार तास लागतात. एका एका जागेवर तासभर प्रतीक्षा करावी लागते. भिवंडी मध्ये तर रस्ता कोणता आणि खड्डे कोणते हे शोधणे मुश्किल झालेले आहे. भिवंडीतली वाहतूक कोंडी जीवघेणी ठरते आहे. या महामार्गावर झालेल्या खड्यांबद्दल कोणीही चकार शब्द बोलायला तयार नाही, टोलची वसुली मात्र बिनबोभाट सुरू आहे. हीच परिस्थिती राज्यातल्या सगळ्यात महामार्गांची झालेली आहे. जनमानसात असंतोष वाढत आहे.
थोरात म्हणाले, अधिवेशनादरम्यान नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खड्डे यांच्यावर काँग्रेसने आवाज उठवला. मंत्री महोदयांनी तातडीने त्यावर कारवाई करतो असे आश्वासनही दिले, मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितले होते, मात्र वाहतूक कोंडीत सुधारणा होण्याऐवजी वाढ झालेली आहे.
प्रत्येक गचक्यात सरकारचा नाकर्तेपणा आठवतो
नाशिक मुंबई रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून जात असताना सामान्य माणसांना जो गचका बसतो तो प्रत्येक गचका ट्रिपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणाची आठवण करून देतो. भरमसाठ टोल अकरायचे, मात्र रस्त्यांची साधी डागडुजी सुद्धा नाही वाहतूक कोंडीवर मार्ग काढायला सरकार तयार नाही.
- बाळासाहेब थोरात
काँग्रेस जनतेच्या उद्रेकासोबत
टोलच्या संदर्भाने राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे मात्र जनतेमध्ये प्रचंड उद्रेक आहे आणि काँग्रेस जनतेच्या या उद्रेकासोबत आहे. रस्त्यावरच्या खड्ड्या बाबतीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही वारंवार हा प्रश्न लावून धरला, विधानसभेत मांडला. सरकारकडून पर्याय मिळत नसल्याने जनतेच्या मनात भरमसाठ टोल आणि भरमसाठ खड्डे यामुळे जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे.
- बाळासाहेब थोरात
एकदा रस्त्यावरून प्रवास करा
मुंबईला जाण्यासाठी अनेक जण रेल्वेचा पर्याय अवलंबतात. सत्ताधारी अनेक आमदारांना माझी विनंती आहे की एकदा रेल्वे ऐवजी गाडीने या रस्त्यावरून प्रवास करून बघा, म्हणजे तुम्ही सुद्धा या रस्त्याची दयनीय अवस्था मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्याल.
- बाळासाहेब थोरात