Friday, September 20, 2024
Homeराज्यअकोल्यात ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’…अभियानाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू काय म्हणाले?

अकोल्यात ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’…अभियानाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू काय म्हणाले?

अकोला – दिव्यांग बांधवांच्या अडचणींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियान महत्वाचे ठरत आहे. हे अभियान या उपक्रमापुरतेच मर्यादित न ठेवता अंमलबजावणीत सातत्य ठेवावे. गरजू दिव्यांग बांधवांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवा व आवश्यक बाबींचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.

विविध प्रवर्गातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पोलीस लॉन झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार किरण सरनाईक, जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, समाजकल्याण सभापती संगीता खंडारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा समाजकल्याण अधिकारी अनिल पुंड, सहायक आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते. या उपक्रमात शासनाच्या सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन निपटारा करण्यात आला व विविध योजनांच्या लाभाचे वितरणही करण्यात आले.

श्री. कडू म्हणाले की, दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मंत्रालय स्थापनेचा निर्णय घेतला. दिव्यांग बांधवांना प्राधान्याने घरकुले मिळवून देण्याबरोबरच अंत्योदय व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, दिव्यांग सर्वेक्षणाबाबत अकोला जि. प. ला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. जिल्ह्यातील नागरी भागात विशेषत: नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातही सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे. जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडून ५ टक्के निधी खर्च होतो किंवा कसे, हे तपासावे. दिव्यांग बांधवांना मिळणारे अर्थसाह्य नियमितपणे वेळेत मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत. दिव्यांगासाठी विविध कल्याणकारी योजना राबविणारे महाराष्ट्र हे आदर्श राज्य म्हणून उभे करण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

अभियानाचे अध्यक्ष श्री. कडू यांनी कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व निपटारा करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. कार्यक्रमातील भाषणे व माहिती मूकबधीर बांधवांना सांकेतिक भाषा सहायकाद्वारे सांगण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमात 45 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात आवास योजना, कृत्रिम अवयव आदी विविध लाभांचे वितरण श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आदी विविध विभागांच्या ३८ कक्षांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याबरोबरच योजनांची माहितीही देण्यात आली. दिव्यांग नोंदणीसाठीही स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आले होते. जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: