नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड येथील चौफळा केंद्रीय प्राथमिक शाळा आणि प्रशालेस शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी भेट दिली असता शिक्षकांनी शाळा वेळेवर न भरवणे, विद्यार्थ्यांत आवश्यक गुणवत्ता नसणे, विद्यार्थ्यांच्या चाचणीचे पेपर निष्काळजीपणाने तपासणे, विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती आणि इतर अनिमित्त आढळल्या आहेत.या संपूर्ण बाबींची चौकशी करून दोषीं विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
विद्यार्थी उपस्थिती आणि शालेय गुणवत्ता पाहण्यासाठी आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी या शाळांना भेट दिली असता शाळेत शिक्षकच उपस्थित नव्हते. विद्यार्थी अगदी चार दोनच अशी अवस्था दिसून आली. शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत: च उपस्थित विद्यार्थ्यांसह प्रार्थना घेतली आणि नंतर शिक्षक हळूहळू अगदी नऊ वाजेपर्यंत येत राहिले. शहरातील शाळांची ही दयनीय अवस्था पाहून शिक्षणाधिकाऱ्यांनी अत्यंत असमाधान व्यक्त केले.
संबंधित केंद्रप्रमुख यांनीही शैक्षणिक तपासण्या नीट केल्या नसल्याचे आढळले आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा चौफाळा दोन सत्रात भरत असून पहिले सत्र 7 वाजता भरणे अपेक्षित असतानाही काही शिक्षक अगदी नऊ वाजेपर्यंत शाळेत येत असल्याचे चित्र दिसले. जिल्हा परिषद प्रशाला चौफाळा येथेही एक मुख्याध्यापक आणि शिक्षक वगळता इतर शिक्षक अनुपस्थित होते. शहरातल्या भरवस्तीतील जिल्हा परिषदेच्या ह्या शाळेचे असे चित्र अत्यंत विदारक होते.
शाळांना भेटी देण्यासाठी स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात येणार असून यावेळी विद्यार्थ्यांची पट नोंदणी विद्यार्थी उपस्थिती आणि शालेय गुणवत्ता पाहण्यात येणार आहे शिवाय शिक्षकांनी केलेल्या सर्व शैक्षणिक कामकाजाची आणि शाळेला मिळालेल्या वेगवेगळ्या अनुदानाची तपासणी करण्यात येणार आहे असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद नांदेड कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा माहूरचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार ,पर्यायीशिक्षण प्रमुख डी टी शिरसाट यांची हे शिक्षणाधिकारी यांच्यासोबत होते.