सांगली – ज्योती मोरे
सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने दुधारी (ता. वाळवा) व कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सोमवारी प्रवीण यशवंत शिरतोडे (वय ३५ रा. दुधारी) व शेखर सुखदेव पावशे (वय ३२, रा. कवठेएकंद) या दोघांचा मृत्यू झाला. ऐन उमेदीत दोन तरुणांचा असा मृत्यू धक्कादायक आहे.
संबंधीत कुटुंबावर दुखाचा जो डोंगर कोसळला आहे. गेल्या वर्षभरात अनेक ग्रामपंचायतींनी डीजे व लेसर शो वर बंदीचे ठराव केले. त्या सर्व ठरावांचे स्वागत आहे, मात्र आजही जिल्ह्यात अनेकठिकाणी मुक्तपणे डीजे व लेसर शो चा वापर केला जात आहे.
मागील वर्षभरात अनेकठिकाणी लेसरमुळे शाळकरी मुलांचे डोळे निकामी झाल्याच्या घटनाही सांगली जिल्ह्यात घडल्या आहेत. दिवसेंदिवस आरोग्यावर घातक परिणाम करणारे व लोकांचे बळी घेण्याचे प्रकार या ध्वनीयंत्रणा व लेसर किरणांमुळे होत आहेत. यामुळे मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.
गुरुवारी जिल्ह्याभरात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. मिरजेत याचे प्रमाण मोठे असते. अशावेळी डीजे व लेसर किरणांचा वापर कोणाकडून होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात.या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांना दिले आहे. ध्वनीयंत्रणा वापरताना डेसीबलची मर्यादा पाळण्याबाबत पोलिस दलाने योग्य नियोजन करावे.
बुधवारी संजयनगर परिसरात डीजे बंद करण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. त्यामुळे पोलिसांना असा कोणी विरोध करीत असेल तर संबंधितांवर कडक कारवाई करावी. कायदा व नियमांचा धाक असायलाच हवा.
उत्सवात याच आधारे सर्वांना शिस्त लागली तर नागरिकांच्या आरोग्यासंबंधीचा हा गंभीर प्रश्न निकाली लागेल, जिल्ह्यात यापुढे निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये वाजल्या जाणाऱ्या डीजेमुळे कोणत्याही व्यक्तीचा जीव जाणार नाही, कोणाला इजा होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी. पोलिसांमार्फत यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना आमचा पाठींबा असून, याविरोधात योग्य ती कार्यवाही होईल अशी आशा मनोज भिसे यांनी व्यक्त केली आहे.