सांगली – ज्योती मोरे
प्रस्थापितांनी बहुजनांसाठी व्यवस्थेचे दार बंद केलं तरी ते लाथ मारून तोडून आणि येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उचलून महाराष्ट्र बाहेर टाकणार असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज सांगलीत व्यक्त केलीय.सरकारी नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.त्यावेळी ते उपस्थितांसमोर बोलत होते.
राज्यात शासनाकडून होऊ घातलेलं कंत्राटीकरण आणि खाजगीकरण रद्द करावं ज्या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आलय त्यांचा ठेका रद्द करावा एमपीएससी परीक्षेतील फी कमी करावी यासह इतर मागण्यांसाठी आज सांगलीतील विश्रामबाग चौकातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान तमाम दलित बहुजन आदिवासी मुस्लिम समाजातील वंचित समूहाचा प्रगतीचा मार्ग बंद करून टाकण्यासाठीच हे षडयंत्र रचलं गेल्याचा आरोपही सुजात आंबेडकर यांनी केलाय.सदर मोर्चा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सांगली जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी,राज्य सदस्य क्रांति सावंत, राज्य उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर आदींसह बहुजन समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.