अमरावती | राज्यात रोडरोमीयोच्या त्रासाला कंटाळून तरुणीला आत्महत्येसारख मोठे पाऊल उचलावे लागते. तर अनेक घटनांमध्ये मुलींची भररस्त्यावर हत्या करतात. असाच खळबळजनक प्रकार राजापेठ पोलीस ठाणे हद्दीतील नवाथे चौक हॉटेल रंगोलीच्या मागे रेल्वे रुळावर पहायला मिळाला. अश्याच रोडरोमीयोच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी राजापेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद देऊन मयत मुलीला न्याय मिळावा, अशी विनंती केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
गौरव मोरेश्वर हरणखेडे (२८, रा. रामेश्वर मंदिराजवळ, अमरावती) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी महाविद्यालयात जात असताना काही दिवसांपासून गौरव तिला त्रास देतो, असे त्यांची मुलगी वारंवार सांगत असे.
८ सप्टेंबर रोजी ते घरी होते. त्यांची मुलगी खूप अस्वस्थ दिसत होती. वडिलांनी मुलीला कारण विचारले असता आरोपी गौरव हरणखेडे हा त्रास देत असल्याचे मुलीने सांगितले. पुन्हा पुन्हा कॉल करतो. तो कॉलेज, ट्यूशन आणि घर यांमध्ये पाठलाग करतो. तरुणीनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी ऐकायला तयार नाही, गौरवच्या रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या मुलीने सकाळी १० वाजता अंबा एक्स्प्रेससमोर उडी मारून जीवनयात्रा संपवली. आरोपी गौरवनेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. असे तक्रारीत नमूद केले असता पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली.