Friday, November 22, 2024
HomeMarathi News Todayमहाराष्ट्रच्या पहिल्या महिला ड्रोन पायलट बनल्या लीनता शेळके वाघमारे...

महाराष्ट्रच्या पहिल्या महिला ड्रोन पायलट बनल्या लीनता शेळके वाघमारे…

वर्धा – शेती व्यवसायात आता नवनवीन बदल घडवून आणले जात असून यात आता महिला देखील मागे नाहीत. कृषी क्षेत्रातील आधुनिक फवारणीच्या तंत्रज्ञानाला वर्ध्यात एका महिला पायलटच्या प्रयत्नांची जोड मिळणार आहे. ‘सलाम किसान’ या भारताच्या सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या डेटा-संचलित व शेतकऱ्यांच्या इत्यंभूत गरजांची काळजी वाहणाऱ्या कृषीमंचाने वर्धा जिल्ह्यातील लीनता शेळके वाघमारे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला ड्रोन पायलटला प्रशिक्षित केले आहे. लीनता यांना ड्रोन प्रशिक्षक कार्यक्रमामध्ये प्रवेश देऊन सलाम किसानने कृषीतंत्रज्ञानामध्ये लिंगनिरपेक्षतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे.

लीनता यांना ड्रोन प्रशिक्षक कार्यक्रमामध्ये प्रवेश देऊन सलाम किसानने कृषीतंत्रज्ञानामध्ये लिंगनिरपेक्षतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांना डीजीसीए मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पाच दिवसांच्या सखोल प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.

लीनता यांचा दृढनिश्चय आणि उत्साह यांनी लिंगाधारित पारंपरिक अडथळ्यांना मोडीत काढले आहे व भविष्यातील शेतीसाठी एक अनुकरणीय उदाहरण सिद्ध केले आहे. त्यांचे हे यश ड्रोन पायलट बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या महिलांसाठी एक प्रेरणा आहेच, पण शेतीच्या भवितव्याला आकार देण्याच्या महिलांच्या क्षमतेचेही ते प्रतीक आहे.

सलाम किसानच्या संस्थापक आणि सीईओ धनश्री मनधानी म्हणाल्या, “आम्ही महिलांना औपचारिक कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या दिशेनेही सातत्याने काम करत आलो आहोत. आमच्या शेकडो फील्ड ऑफिसर्समधून लीनता या परिवर्तनाची ज्योत म्हणून पुढे आल्या.

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये एक फील्ड ऑफिसर म्हणून काम करण्यापासून सुरुवात करत आज त्या महाराष्ट्राच्या पहिल्या ड्रोन पायलट बनल्या आहेत. माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि हा प्रवास त्यांच्या सोबत करण्यास उत्सुक आहे. भारत सरकारही त्यांच्या आगामी योजनांमुळे अशाचप्रकारचे उपक्रम हाती घेत आहे, जिथे १५ हजार महिला स्वमदत गटांना शेतीसाठीचे ड्रोन्स पुरविले जाणार आहेत, ही बाबही हुरुप वाढविणारी आहे.”

लीनता शेळके वाघमारे म्हणाल्या, “शेतकऱ्याच्या कुटुंबातच लहानाची मोठी झाल्याने मला नेहमीच शेतीमध्ये रस होता. जेव्हा मी सलाम किसानशी जोडले गेले तेव्हा धनश्री मॅमनी मला स्वत:ला अधिक कौशल्यांनी सुसज्ज होण्यासाठी प्रोत्साहन दिले.

त्या एक मोठी कंपनी चालवित असतानाच शेतीच्या कामांचे आधुनिकीकरण करत आहेत या गोष्टीपासून मला प्रेरणा मिळाली. त्यांच्या पाठिंब्याने मी हे विस्तृत प्रशिक्षण पूर्ण केले आणि ड्रोन उडवायला शिकले. हे एखादे स्वप्न साकार होण्यासारखे आहे आणि आता मी शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत करू शकते. मी देशाच्या कृषीक्षेत्राला आपले योगदान देत आहे, याचा मला आनंद आहे.”

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: