Friday, November 22, 2024
Homeराजकीयनरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला...

नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला – नाना पटोले…

सहाव्या दिवशीही काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला जनतेचा दांडगा प्रतिसाद.

मुंबई – स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारने देशात सुईपासून रॉकेट पर्यंतचा विकास केला. चंद्रावर चांद्रयान-३ सोडले त्या इस्रोची स्थापनासुद्धा काँग्रेस सरकारच्या काळातच झाली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेवर आले पण या सरकारने मागील ९ वर्षात नवीन काहीच उभे केले नाही.

उलट काँग्रेस सरकारने उभे केलेल्या सर्व बँका, रेल्वे, विमानतळे, विमा कंपन्या विकून टाकल्या. देश स्वतंत्र झाल्यापासून ६७ वर्षांत सर्व सरकारांनी मिळून ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले पण मोदी सरकारने मागील ९ वर्षात तब्बल १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली कन्हान जिल्हा नागपुर येथे आज जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. यावेळी माजी मंत्री सुनिल केदार, माजी मंत्री व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक, उपाध्यक्ष नाना गावंडे व पदाधिकारी मोठ्या संख्यने सहभागी होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पारशिवनी येथे जाहीर सभा झाली. यावेळी ते पुढे म्हणाले की, केंद्रातील तानाशाही सरकारच्या विरोधात ही लढाई सुरु आहे. मोदी सरकारने महागाई प्रचंड वाढवली, औषधे महाग केली, शेतीला लागणाऱ्या साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटले. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसांकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढून मोदी त्यांच्या मित्रोंचे खिसे भरत आहेत.

उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि सत्तेत येताच मोदी सरकार संविधानच संपवायला निघाले. जनतेमध्ये केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तिघाडी सरकाबद्दल तीव्र नाराजी असल्याचे जनसंवाद यात्रेत लोकांशी संवाद साधताना स्पष्ट दिसत आहे. जनतेशी सुरु झालेला हा संवाद थांबणार नाही, १२ तारखेपर्यंत जनसंवाद यात्रा सुरु राहणार आहे, त्यानंतर पुन्हा एक यात्रा घेऊन आम्ही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील ट्रीपल इंजिन सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती दिली. सांगली जिल्ह्यात माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी मिरज तालुक्यातील एरंडोली येथे कोपरा सभेला संबोधित केले. समाजातील सर्व घटकांकडून जनसंवाद पदयात्रेला सहाव्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: