न्यूज डेस्क : घरगुती स्वयंपाकाच्या LPG गॅस सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याअंतर्गत गॅस सिलिंडरच्या किमती 200 रुपयांपर्यंत कमी होणार आहेत. या कपातीचा फायदा लोकांना अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे. याआधी 1 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात केली होती. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मोदी सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर 200 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही देण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता एलपीजी सिलिंडर बाजारापेक्षा ४०० रुपयांनी कमी दराने मिळणार आहे.
यावर्षी मार्चमध्येही मोदी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. दुसरीकडे, आता या अतिरिक्त अनुदानामुळे उज्ज्वला योजनेच्या सुमारे 9 कोटी लाभार्थ्यांना जवळपास निम्म्या किमतीत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर मिळू शकणार आहे.
सरकारच्या या निर्णयाला आगामी निवडणुकांशीही जोडले जात आहे. यावर्षी देशातील राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2024 च्या सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत महागाई हा मोठा निवडणुकीचा मुद्दा आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींवरून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.