कोल्हापूर – राजेद्र ढाले
पुणे-बेंगलोर महामार्गाचे विस्तारिकरण होत असताना उचगाव व तावडे हॉटेल येथील उड्डाण पुलाची उंची वाढवा आणि तीनही एम.आय.डी.सी.ना जोडणारे सेवारस्ते खंडीत न करता पुर्ण करा, अशी मागणी शुक्रवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उजळाईवाडी येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे तांत्रिक व्यवस्थापक चंद्रकांत भरडे यांच्याकडे केली.
महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान उचगाव व तावडे हॉटेलजवळील उड्डाण पुलांची उंची वाढवण्यात यावी. या पुलांची उंची कमी असल्याने वाहतुकीच्या कोंडीचा फटका तर बसतोच इंधनही वाया जाते. वेळेचा अपव्यय होतो. एखादया गंभीर रूग्णाला ताबाडतोब रूग्णालयात दाखल करण्यास घेवून जाताना येथील वाहतुकीच्या कोंडीचा नेहमीच त्रास होतो.
शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, हुपरी चांदी बाजारपेठ, गांधीनगर बाजारपेठ येथे हजारो वाहने ये-जा करत असताना उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने तेथे वाहतुकीची कोडी नित्याची बाब आहे.
कधी तेथे पोलीस असतात कधी ते नसतात त्यामुळे याठिकाणी जी वाहतुकीची कोंडी होते त्याचा फटका कामगार, सरकारी नोकर, व्यापारी, उद्योजक, बाजारपेठेत सेवा बजावणारे कर्मचारी आणि विशेषतः महिला वर्गास बसतो. याकरीता दोन्ही उड्डाण पुलाची उंची वाढविण्यात यावी.
महामार्गावर सेवारस्ते खंडीत झाल्यामुळे सरनोबतवाडीकडून उचगावला येताना अनेक अपघात झाले आहेत. त्यात काही जणांचा बळीही गेला आहे. औद्योगिक वसाहतीकडे जाताना अनेकांचा अपघातामुळे बळी गेला आहे.
अखंडित सेवा रस्ता नसल्याने वारंवार अपघात होतात. त्यामुळे सेवारस्ते खंडित न करता ते पूर्ण करावेत, अशी मागणी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी भरडे यांच्याकडे केली. प्रशासनाने याची वेळीच दक्षता घ्यावी अन्यथा जनआंदोलन उभा करण्यात येईल, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला.
याबाबतचे निवेदन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उजळाईवाडीचे व्यवस्थापक (प्रकल्प कार्यान्वयन इकाई कोल्हापूर) यांना देण्यात आले. जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पूर्वीच्या चुका नक्की भरून काढू, असे आश्वासन यावेळी प्रशासनातर्फे शिवसैनिकांना देण्यात आले.
तालुकाप्रमुख विनोद खोत, दत्ता पाटील, जितेंद्र कुबडे, योगेश लोहार, शांताराम पाटील संतोष चौगुले यांनी कैफियत मांडली. शरद माळी, बाळासो नलवडे, अजित चव्हाण, किशोर कामरा, रवींद्र जाधव, भारत खोत, आदि शिवसैनिकांनी चर्चेत भाग घेतला.
पुणे-बंगलोर महामार्गावरील उचगाव व तावडे हॉटेल उड्डाण पुलांची उंची वाढवा व सेवारस्ते अखंडित करा, याप्रश्नी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोब चर्चा करताना शिवसैनिक.