रामटेक – राजू कापसे
७ जानेवारी २०२० रोजी झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीत पंचायत समीती सदस्य म्हणुन निवडुन आलेले व नंतर पंचायत समिती रामटेक येथील सभापती पदावर आरूढ झालेले संजय नेवारे यांनी विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने स्वतःचे पद गमावले आहे. विभागीय आयुक्तांनी नुकतेच याबाबदचे आदेश काढुन त्यांना अपात्र घोषीत केले आहे.
अर्जदार तथा बोथिया पालोरा येथील रहिवाशी श्री मनीष रामकृष्ण मडावी तसेच श्री मुकेश मधुकर पेंदाम राहणार देवलापार यांनी सभापती संजय नेवारे यांनी निवडुन आल्यानंतर विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याप्रकरणी त्यांना अपात्र करावे याबाबद विभागीय आयुक्तांकडे प्रकरण दाखल केले होते.
दरम्यान विभागीय आयुक्तांनी संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीअंती सभापती संजय नेवारे यांना अपात्र घोषीत केले. दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत बोथिया पालोरा या प्रभागातून पंचायत समिती सदस्य पदाकरिता निवडणूक घेण्यात आली होती.
सदर निवडणुकीत श्री संजय पुनारामजी नेवारे यांनी अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून पंचायत समिती सदस्य पदासाठी नामनिर्देशन भरलेले होते व सदर राखीव पदावरून ते विजयी झाले होते. नियमानुसार संजय नेवारे यांनी निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांक पासून बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते परंतु तसे त्यांनी केले नाही.