Friday, November 22, 2024
Homeराज्यमुंबईतील ‘इंडिया’ची बैठक विशेष महत्वाची, बैठकीच्या तयारीवर चर्चा :- नाना पटोले...

मुंबईतील ‘इंडिया’ची बैठक विशेष महत्वाची, बैठकीच्या तयारीवर चर्चा :- नाना पटोले…

‘इंडिया’च्या बैठकीच्या तयारीसाठी तिन्ही पक्षांतील प्रत्येकी ५ नेत्यांचा गट.

दुसऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या भाजपाचाच भ्रष्ट चेहरा उघड करु.

मुंबई – काँग्रेस पक्षासह देशातील महत्वाच्या पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत ही बैठक होत असून राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर होत असल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बैठकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी ५ नेत्यांचा गट तयार करण्यात आला आहे.

काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा गट काम करणार असून मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी तिन्ही पक्ष जोमाने काम करत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

वरळीच्या नेहरू सेंटर येथे यासंदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनिल देसाई आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणारी इंडियाची ही तिसरी बैठक आहे. मुंबईतील बैठक चांगली व्हावी यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

मुंबईतील बैठकीत विविध विषयांवर चर्चा होईल. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, संसदीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, यांच्यासह महत्वाच्या व्यक्ती या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

यासंदर्भात राज्य सरकारला माहिती देण्यात येईल, सरकारी व्यवस्थेसंदर्भात विरोधी पक्षनेते सरकारशी संवाद साधतील. देशात मागील ९ वर्षांपासून सुरु असलेल्या हुकूमशाही व्यवस्थेविरोधात इंडिया आघाडी स्थापन झालेली आहे. पाटणा व बंगळुरूतील बैठक यशस्वी पार पडल्यानंतर मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे.

मुंबईतील इंडिया आघाडीची बैठक यशस्वी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार असून या समितीत तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश असेल.

काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खा. संजय निरूपम हे या समितीचे सदस्य असणार आहेत.

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, दुसऱ्यांना भ्रष्ट्चारी म्हणणाऱ्या भाजपाचा भ्रष्ट चेहरा आम्ही उघड करणार आहोत. शिंदे सरकारमध्ये भाजपाचे अनेक मंत्री भ्रष्टचारी आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती आमच्याकडे आहे, लवकरच त्यांचा पर्दाफाश केला जाईल.

जलसंपदा विभागात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप देशाचे पंतप्रधान करतात व दोन दिवसातच त्या पक्षाला सत्तेत सहभागी करुन घेता, हे कसे काय ? भाजपाकडे आले की पवित्र होतात का ? असा संतप्त सवाल पटोले यांनी विचारला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: