नागपूर – शरद नागदेवे
श्री संकटमोचन हनुमान मंदिर पंचकमिटी (ट्रस्ट) श्रीहरी नगर मानेवाडाची (नोंदणी क्र.ई – ३७३६) वार्षिक सर्वसाधारण सभा विठ्ठलराव घोडे यांचे अध्यक्षतेखाली हनुमान मंदिर, श्रीहरी नगरच्या परिसरात संपन्न झाली.
यावेळी उपाध्यक्ष कवडुजी इटनकर, सचिव रामेश्वर भुते, सहसचिव सुरेश उरकुडे, कोषाध्यक्ष रामदास कोल्हे, घनश्याम ढोले, डॉ. अशोक मंदे, रामकृष्ण कोल्हे, विजय लोणारे, दुर्गाप्रसाद कावडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थेचे सचिव रामेश्वर भुते यांनी विषयाचे वाचन केले.
यावेळी सन २०२२-२३ चा प्रथम वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यात आला. तसेच २०२२-२३ वर्षाचा संस्थेचा ताळेबंद व नफातोटा लेखा परीक्षकाचा अहवाल सादर करण्यात आला.
या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. संस्थेची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी सर्व सभासदांनी वार्षिक वर्गणी जमा करण्याची सूचना करण्यात आली.यावेळी मंडळाने विविध सामाजिक व अध्यत्मिक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.
मंडळाचे सदस्य डॉ. सोहन चवरे, जानराव बारई, विधीज्ञ जयरमसिंग ठाकूर यांनी विविध सूचना व प्रस्ताव सादर करून ते राबविण्याचे आवाहन केले. त्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भविष्यात मंडळातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम, श्रीहरी नगर भागात डांबरी रस्ते,
सांडपाण्यासाठी नाली, स्ट्रीट लाईट आदी कामाचा पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. परिसरात वाढत्या चोरीचे प्रकार बघता सर्वांना विश्वासात घेऊन सुरक्षारक्षक नेमण्याचे मंडळातर्फे प्रस्तावित करण्यात आले. याशिवाय वाचनालय, करिअर मार्गदर्शन शिबिर, आरोग्य व रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. सभेच्या शेवटी संस्थेचे सचिव रामेश्वर भुते यांनी आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.