Friday, November 22, 2024
HomeMarathi News Todayभारसाखळे यांनी केलेले BT मॉलचे अनधिकृत बांधकाम काढून टाकावे…मूर्तिजापूर पालिकेकडे करण्यात आली...

भारसाखळे यांनी केलेले BT मॉलचे अनधिकृत बांधकाम काढून टाकावे…मूर्तिजापूर पालिकेकडे करण्यात आली तक्रार….

संजय आठवले, आकोट

नगरपरिषद मूर्तिजापूर चे हद्दीतील प्लॉट क्र.२६/१ मधील नझूल प्लॉट क्र. २/१/अ, शीट क्रमांक १६ बी या जागेवर व्ही.पी. इन्फ्रा चे भागीदार विजय प्रकाश भारसाखळे यांनी बीटी मॉल हे नाव असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून याकरिता नगरपरिषद मूर्तिजापूर यांचेकडून कोणतीही बांधकाम परवानगी घेतलेली नसल्याने अनधिकृत असलेले हे बांधकाम त्वरित काढून टाकण्यात यावे. तथा तक्रारीतील मुद्द्यांची शहनिशा झाल्याखेरीज कोणतीही बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये. अशा आशयाची तक्रार दीपक मंत्री यांनी मूर्तिजापूर पालिकेकडे केली आहे.

या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे कि, नगरपरिषद मूर्तिजापूरचे हद्दीतील प्लॉट क्र. २६/१ मधील सीट क्र. १६ बी, प्लॉट क्र.२/१/अ या जागेचे क्षेत्रफळ ३,४०९ चौ.मी.आहे. ही जागा तत्कालीन उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर यांनी रामाक्र. एन. ए. पी.-३४/ मुर्तीजापुर/ ८/ १९८४-८५ दिनांक १८.६.१९८५ अन्वये अकृषीक केलेली आहे. या जागेवर प्रतिभा चित्रपट गृह उभारण्यात आले. ज्याचा परवाना आजही अद्यावत आहे. या जागेच्या पूर्वेस कारंजा मार्गास लागून १२ मीटर रुंदीचा रस्ता अकृषीक नकाशात दर्शविण्यात आलेला आहे.

वर्तमान स्थितीत या जागेवरील चित्रपटगृहाची इमारत पाडून टाकण्यात आली आहे. आणि त्या ठिकाणी चित्रपटगृहा ऐवजी अन्य प्रयोजनाकरिता टोलेजंग इमारत उभी केली गेली आहे. असे करणेकरिता मनोरंजन विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे या जागेच्या अकृषिक नकाशात दर्शविलेला १२ मीटरच्या रस्त्यावरही पक्के बांधकाम करण्यात आलेले आहे. हे बांधकाम बीटी मॉल उभे करण्याकरिता केले आहे. यासोबतच दक्षिण दिशेकडून हा १२ मीटरचा रस्ता I LOVE BT MALL MURTIJAPUR असे लिहिलेली भिंत बांधून पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

मॉलचे हे बांधकाम करणे करिता व्हीपी इन्फ्राचे भागीदार विजय प्रकाश भारसाखळे यांनी नगरपरिषद मूर्तिजापूरकडे दि.१९.४.२०२१ रोजी ऑनलाइन प्रपोजल क्र.१७२०३७ हे बांधकाम परवानगी करता दाखल केले होते. परंतु सदर बांधकाम नियमानुसार होत नसल्याचे सांगून पालिकेने ही परवानगी देण्यास इन्कार केला होता. परिणामी हे प्रपोजल बाद झाले. त्यामुळे विजय भारसाखळे यांनी नगरपरिषदेचे मान्यता प्राप्त अभियंता अनिल अग्रवाल यांचे साइटवरून मूर्तिजापूर पालिकेकडे दि.१.३.२०२३ रोजी रिवाईज परमिशनकरिता पुन्हा अर्ज केला. परंतु मूर्तीजापुर पालिका नगर रचनाकार यांना हा सावळा गोंधळ माहीत झाल्याने त्यांनी ही रिवाईज परवानगी देण्यास नकार दिला.

परंतु सद्यस्थितीत राजकीय दबाव येत असल्याने मूर्तिजापूर नगरपरिषद ऑनलाईन ऐवजी ऑफलाइन परवानगी देण्याचे तयारीत असल्याचे नमूद करून या तक्रारीत पुढे म्हटले आहे कि, शासकीय नियमानुसार ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक असताना तसे न करताच या इमारतीचे निर्माण करण्यात आले आहे. एफ. एस. आय.चे नियम डावलून या ठिकाणी बहुमजली बांधकाम केलेले आहे. ही इमारत बांधताना नियमानुसार सोडावे लागणारे समास अंतर सोडण्यात आलेले नाही. इमारतीस आग लागल्यास या ठिकाणी अग्निशमनचे वाहन जाऊ शकत नाही. अर्थात आग नियंत्रणात आणणेकरिता येथे व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ह्या इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र कसे देणार? हा प्रश्न उपस्थित करून याची माहिती मला द्यावी असे तक्रारकर्त्याने म्हटले आहे.

याखेरीज ह्या इमारतीत येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगकरिता जराही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे येणारी सर्व वाहने मुख्य रस्त्यावर उभी केली जाणार आहेत. परिणामी रहदारीस मोठा अडथळा निर्माण होणार आहे. इमारत निर्माणाची कोणतीही परवानगी नाही. काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र नाही. तरीही या संकुलातील दुकान भाड्याने देणे सुरू असून अनेक दुकाने सुरूही झालेली आहेत. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लहान मुलांची शाळा व मोठ्यांकरता व्यायामशाळा, उपहारगृह आहे. तेथे जाण्याकरिता या इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्यात आली आहे. मात्र याची कोणतीही परवानगी काढण्यात आलेली नाही. त्यामुळे या इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला तथा ऑफलाइन परवानगी देण्यात येऊ नये. अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.

ही तक्रार दि.१८.७.२०२३ रोजी मूर्तिजापूर पालिकेत देण्यात आली आहे. पालिका मुख्याधिकाऱ्यांनी अवलोकन करून ही तक्रार पालिका नगररचनाकार स्वप्निल बिलारी यांचेकडे पाठविलेली आहे. या संदर्भात तक्रारकर्ता दीपक मंत्री यांचेशी संपर्क साधला असता, “मी ही तक्रार केली नाही. हा कुणीतरी खोडसाळपणा करून आमदार भारसाकळे आणि माझ्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयास करीत आहे.” असे उत्तर त्यांनी दिले. परंतु तक्रारीतील भाषा, इमारतीच्या त्रुट्या दर्शविणेकरिता नमूद केलेले बारकावे, नियम, बंधने आणि कायदेशीर बाबींचा उल्लेख पाहू जाता ही तक्रार बांधकाम क्षेत्रातील जाणकार आणि अनुभवी व्यक्तीने लिहिल्याचे दिसून येते. याखेरीज ही तक्रार लिहिणारास या इमारतीची खडा न् खडा माहिती असल्याचे व तो अभियंता असल्याचेही स्पष्ट होते. त्यामुळेच सदर तक्रारीत दमदार तथ्य असल्याची खात्री पटते. म्हणून कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता मुख्याधिकारी यांनी निरपेक्ष कारवाई करणे अपेक्षित आहे.

“सदर तक्रार माझ्याकडे आली असून मी तिचे अवलोकन केलेले आहे तक्रारीत लिहिलेल्या मुद्द्यांची खातरजमा करून त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.”– मुख्याधिकारी – टवलारे, न.प. मुर्तिजापूर

“या तक्रारी संदर्भात पालिका मुख्याधिकारी यांचेशी चर्चा करून त्यांचे निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल.”– नगररचनाकार – स्वप्निल बिलारी, न.प. मूर्तिजापूर

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: