आकोट – संजय आठवले
मणिपूर राज्यातील कांगपोकपी येथे आदिवासी महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांचेवर सामूहिक पाशवघ बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आकोट परिसरातील आदिवासी समाज बांधवांनी केली आहे. त्याकरिता उपविभागीय अधिकारी आकोट यांचे मार्फत देशाच्या राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मणिपूर राज्यातील कांगपोकपी येथील जमावाने दोन आदिवासी महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांचेवर सामूहिक बलात्कार केला आहे.
परंतु तेथील राज्य शासनाने या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. घटनेची तक्रार गावच्या सरपंचांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिली. परंतु पोलिसांनी ती तक्रार दाबून ठेवली. ती बाहेर येण्यास तब्बल ७७ दिवसांचा कालावधी लागलेला आहे.
हल्लेखोर मेतई समुदायाच्या जमावाने पीडित महिलांच्या घरावर हल्ला करून त्यांचा भाऊ आणि वडील यांनाही ठार केले आहे. या घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयानेही आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा.
आणि तेथे राष्ट्रपती राजवट लावली जायला हवी. मात्र तसे होत नसल्याने मणिपूर येथे आदिवासी समाजावर अमानुष अत्याचार होत आहेत. या साऱ्या घटनांनी संपूर्ण देशातील आदिवासी समाज व्यथित झाला आहे.
या घटनांचा निषेध करून आकोट परिसरातील आदिवासी समाजाने त्या दोन महिलांशी अमानविय व्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे. हे निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर सोळंके, भिल समाज समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देविदास भास्कर,
एकलव्य पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे, कोरकू समाज अध्यक्ष व वस्तापूर सरपंच संजय कासदे, पंचायत समिती सदस्य हिरालाल कासदेकर, सुभाष भोयर, पत्रकार अभिजीत सोळंके, वस्तापूर उपसरपंच अविनाश दिगर, समाजसेवक जानराव बेलसरे, शांताराम मोरे, शंकर भारसाखळे, सुनलाल पवार, बापूराव तायडे रित्विक रेंगे गौरव सोळंके, आदित्य सोळंके इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.