सांगली – ज्योती मोरे
कवठेमहांकाळ दि.२८ (वार्ताहर) कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिर, बोअर मधील मोटारी व दुचाकी गाड्यांची चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या कवठेमहांकाळ पोलिसांनी आवळल्या असुन, शेतकऱ्यांच्या मोटारी चोरणारे संदीप सुरेश चौगुले (वय ३१), शुभम प्रकाश पवार (वय १९) राहणार रांजणी, प्रशांत अनिल महाजन (वय २१),
शुभम रमेश महाजन (वय १९) योगेश युवराज ओलेकर (वय २१) राहणार कोकळे (तालुका कवठेमहांकाळ) या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरीच्या २ मोटरसायकली व १० मोटार पंप असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. चोऱ्या करणारे तरुण कोकळे व रांजणी गावातील असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विहीर व बोअर मधील मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबतच्या अनेक तक्रारी पोलिसांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. शेतकऱ्यांचे साहित्य चोरणारे चोरटे पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी शोध मोहीम राबवली होती. पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक यांनी चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम आदेश दिले होते.
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील डी.बी पथकाचे पोलीस नाईक अमिरशा फकीर यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, कोकळे (तालुका कवठेमहांकाळ) येथील संदीप चौगुले हा त्याच्या फायद्या करीता, कोकळे गावातील तसेच आसपासच्या गावातील मुलांना सोबत घेऊन विहीर व बोअर मधील पाणी ओढण्याच्या मोटर चोरी केली आहे.
सदर बाबत पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक यांना ही घटना कळवून पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेत असताना, कोकळे गावी संदीप चौगुले हा मिळून आला. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता, संदीप चौगुले यांने कवठेमहांकाळ पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यातील फरशीमळा रांजणी या ठिकाणावरून एक मोटार चोरी केल्याबाबत कबुली दिली.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, चौगुले याने कोकळे, रांजणी व इतर ठिकाणी त्याच्या ईतर साथीदारांसोबत मिळून, दोन मोटर सायकली देखील चोरी केली असल्याची कबुली दिली असून, या चोरट्यांच्याकडून पोलिसांनी १० मोटारी ताब्यात घेतलेल्या आहेत. याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदेश नाईक यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद जाधव, उषा वाघमारे, मनीषा बजबळे, प्रतिभा शिंदे, रूपाली देसाई, डी बी पथकाचे पोलीस नाईक अमिरशा फकीर, चंद्रसिंग साबळे, समीर शेख, संदीप सावंत, नागेश मासाळ, विनोद हसबे, पोपट देसाई यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.
कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहीर व बोअर मधील मोटारी चोरीला जात असल्यामुळे, शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान होत होते. याबाबत पोलिसांनी तातडीने हालचाल करत चोरट्यांना ताब्यात घेतल्यामुळे पोलिसांचे अभिनंदन होत आहे.