Friday, November 22, 2024
Homeराज्यभारसाखळे पेचात अन् मिटकरी जोशात… हिवरखेड नगर परिषदेचा अस्सल मानकरी कोण?… आमदारद्वय...

भारसाखळे पेचात अन् मिटकरी जोशात… हिवरखेड नगर परिषदेचा अस्सल मानकरी कोण?… आमदारद्वय भारसाखळे, मिटकरी कि गावकरी…

आकोट – संजय आठवले

हिवरखेड ग्रामपंचायत नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याची उद्घोषणा जाहीर होताच आमदार भारसाखळे व आमदार मिटकरी यांचे दरम्यान या कामाचे श्रेय लाटण्याची चढाओढ लागली असून काही लोक भारसाखळे यांचे नावाने शंख फुंकित असून काही लोक मिटकरींचा डंका पिटत आहेत. तर काही लोक अनेक वर्षांची तपस्या फळास आल्याचे मानून आनंद व्यक्त करीत आहेत.

या त्रिवेणी संगमामुळे हिवरखेड नगरपरिषद होण्याचा अस्सल मानकरी कोण? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु या घटनाक्रमाचे बारकाईने अवलोकन केले असता, हिवरखेड नगरपरिषद होणेकरिता गत अनेक वर्षांपासून विविध मार्गांनी झुंज देणारे गावकरीच या यशाचे सच्चे हक्कदार असल्याचे दिसून येते.

हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत अथवा नगर परिषदेमध्ये रूपांतरण करण्याचा प्रश्न अतिशय जुना आहे. ह्या मागणी करिता हिवरखेड वासियांनी एकत्रितपणे लढा दिला आहे. त्यामध्ये पत्रकार अर्जुन खिरोडकर, माजी सरपंच रामेश्वर शिंगणे, गटनेता रवी घुंगड यांचे आमरण उपोषण, शासनाला स्वरक्ताने लिहिलेली पत्रे पाठविणे, सामाजिक कार्यकर्ता धीरज बजाजची इच्छा मरणाची मागणी या ठळक घटना आहेत.

याखेरीज आजवर झालेले ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अनेक संस्था, संघटना, व्यापारी, शेतकरी, विविध लोकप्रतिनिधी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी या साऱ्यानीच या लढ्यात तन-मन-धनाने सहभाग दिला आहे. त्यामुळे हा प्रश्न संपूर्ण गावाचा प्रश्न बनलेला होता.

अशा स्थितीत आमदार अमोल मिटकरी यांनी हा प्रश्न धसास लावून मान्यतेच्या अंतिम पडावापर्यंत नेला. परंतु स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळे यांचा श्रेयवाद जागा झाला. सोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांची चिंताही कबरेतून बाहेर निघाली. हिवरखेड नगरपंचायत झाल्यास भारसाखळेंच्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वावर पाणी सोडावे लागणार होते.

ज्याकरिता ते अजिबात तयार नव्हते. म्हणून भारसाखळे यांनी ऐनवेळी चालत्या गाडीची खिळ काढली. आणि तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्याने नगरपंचायत होण्यावर स्थगनादेश आणला. वास्तविक त्यांनी हा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु धूर्त फडणवीसांनी स्थागनादेशावर भागविले.

त्यावर हिवरखेडात मोठा गदारोळ झाला. लहानापासून ते थोरांपर्यंत सारे लोक भारसाखळेंना दूषणे देऊ लागली. नाही म्हणायला हाताच्या बोटावर मोजता येतील इतके समर्थक भारसाकळे यांच्या पाठी होते. पण ते परवडणारे नव्हते. हिवरखेड परिसरात दररोज तीव्रतेने वाढता विरोध पाहू जाता अखेर भारसाखळे यांनी नमते घेतले.

आणि १९.१२.२०२२ रोजी हिवरखेड नगरपरिषद करणेबाबत त्यांनी शासनास पत्र दिले. परंतु ही केवळ जनक्षोभाला आवर घालण्याची त्यांची खेळी होती. हे या पत्रानंतर त्यांनी काहीच हालचाल न केल्याने समजून येते. त्यांना केवळ २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत वेळ काढावयाचा होता.

परंतु या दरम्यान आमदार मिटकरी यांनी दि.८.३.२०२३ रोजी तारांकित प्रश्न क्रमांक १९६०७ उपस्थित केला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणाची घडी विस्कटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले झाली. अजित पवारच्या नेतृत्वात एक धडा भाजप सेना सरकारात सामील झाला. या धड्यात मिटकरीही होते. त्यामुळे भारसाखळे सोबतच मिटकरी ही सत्ताधारी बनले. त्यातच त्यांचे नेता अजित पवारचा टक्का वधारला. त्याचे कारणही तसेच आहे.

ते असे कि, भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःचा सर्वे केला. त्यामध्ये “शिंदे सोबत राहिल्याने भाजपचे नुकसान होईल” असे अनुमान काढण्यात आले. त्यामुळे भाजपला एका ‘पावरफुल’ मराठा चेहऱ्याचा शोध होता. तो अजित पवार यांनी भाजपला समर्थन दिल्याने पूर्ण झाला. त्यामुळे भाजप नेतृत्वाने अजित पवारची तळी उचलून धरली. त्याने साहजिकच अजित पवारच्या शब्दाला राज्य शासनात कमालीचे वजन प्राप्त झाले. त्याचा लाभ मिटकरीनाही झाला.

महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांच्या शब्दापुढे फडणवीसांना भारसाखळेंचे मोल राहिलेले नाही. त्यातच एकीकडे आकोट मतदार संघातील अनेक जुने जाणते भाजप नेते, कार्यकर्ते भारसाखळे यांचे ‘छुपे वैरी’ बनलेले आहेत. तर दुसरीकडे संघ परिवारातील सर्वच शाखांनी भारसाखळेंबाबत आपली नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचविलेली आहे.

संघाच्या खाजगी सर्वे मध्येही भारसाखळे यांचे पारडे अतिशय हलके झालेले आहे. त्यामुळे फडणवीस यांची त्यांचेवरील मर्जी खफा झालेली आहे. याखेरीज श्वासोच्छवास घेतानाही फडणवीसांची संमती घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारसाखळे यांना मदत करणे दुरापास्तच आहे.

त्यामुळे मिटकरी यांनी हिवरखेड संदर्भात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकूल उत्तर दिले. आणि २६ जुलै रोजी हिवरखेड नगर परिषदेची उद्घोषणा जाहीर झाली. परंतु त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ह्या प्रश्नी वेळ काढूपणा करण्याची आमदार भासाखळे यांची खेळी उध्वस्त झाली. आणि त्यांची गोची होऊन ते धर्म संकटात सापडले.

ते असे कि, एकीकडे आता ते काही केल्या हिवरखेड प्रकरण थांबवू शकत नाहीत. तर दुसरीकडे हिवरखेड नगरपरिषद झाल्यास त्यांच्या कार्यकर्त्यांची ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेची पदेही वाचवू शकत नाहीत. अशा बिकट स्थितीने भारसाखळे पेचात पडले असून मिटकरी मात्र जोशात असल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण स्थिती अशी असल्याने ह्या कामाचे श्रेय भारसाखळे यांना देणे म्हणजे वास्तव नाकारण्यासारखे आहे. त्यामुळे आपली बाजू सावरून घेणेकरिता भारसाखळे यांचे कार्यकर्ते कितीही छाती फुगवून ‘हे काम भाऊंनीच केले’ असे सांगत असले तरी, हे काम भाऊंनी अजिबात केलेले नसून ऊलट या कामामुळे ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी प्रकाश भाऊंची स्थिती झाली आहे.

तर दुसरीकडे आमदार मिटकरींचे कितीही तुणतुणे वाजविण्यात येत असले तरी, केवळ अजित पवार यांनी दगाबाजी करून भाजपला साथ दिली. त्याने त्यांचे पारडे जड झाले. त्यामुळे ‘गाड्या सोबत नळ्याची यात्रा’ या न्यायाने मिटकरींच्या शब्दांनाही वजन आले. आणि त्यानेच मुख्यमंत्री शिंदे यांना नाईलाजाने ही उद्घोषणा करावी लागली आहे.

त्यासोबतच मुत्सद्दी राजकारणाचे, पक्ष बांधणीचे, लोकसंग्रहाचे कोणतेही कसब नसतानाही मिटकरी यांना आमदारकीचे वेध लागलेले आहेत. त्यावर ‘काकदृष्टी’ ठेवून मिटकरी यांनी हे काम केलेले आहे. त्यामुळे केवळ योगायोगाने प्राप्त झालेल्या मोक्यामुळे मिटकरी हे काम करू शकले आहेत. हे वास्तव नाकारण्याजोगे नाही.

म्हणूनच भारसाखळे – मिटकरी यांची हिवरखेड नगर परिषदेच्या श्रेयाची झुंज निव्वळ मर्कट चेष्टा आहे. याचे कारण असे कि, हिवरखेडवासियांनी आपला रेटा जराही कमी होऊ दिला नाही. अधून मधून हे लोक वातावरण तापवितच राहिले. अगदी भारसाखळे यांनी नगरपरिषद होणेकरिता केलेल्या घोषणेची वर्षपूर्ती हिवरखेड वासियांनी ‘चॉकलेट डे’ म्हणून साजरी केली. त्यावर पोलीस प्रशासनाकरवी संबंधितांवर दबावही आणला गेला.

परंतु हिवरखेडकर तसूभरही मागे हटले नाहीत. परिणामी “भारसाकळे घोरात तर मिटकरी जोरात” राहिले. त्यामुळे हिवरखेड नगरपरिषद होण्याचे “अस्सल हिरो” सारे हिवरखेडवासियच आहेत यात दुमत नाही. नगरपरिषद होणेकरिता त्यांनी दिलेली झुंज हिवरखेडच्या इतिहासात नोंदली जाईलच. आणि हा इतिहास सार्वत्रिक मागणीचा लढा कसा लढावा? याची अन्य गावांना प्रेरणा देत राहील.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: