- जखमी होणार्या वन्यप्राण्यांचे प्राण वाचविण्यात वनविभाग सपशेल फेल
- नागरिकांची ओरड, कारवाई ची केली मागणी
- रामटेक वनपरीक्षेत्रांर्गत घडल्या घटना
रामटेक – राजू कापसे
वनपरीसरात दिवसेंगणीक मंदावत चाललेल्या हिरव्या चाऱ्याच्या प्रमाणामुळे नाईलाजास्तव हिरव्या चाऱ्याच्या शोधार्थ वन परिसरातील वन्यप्राणी शेत शिवाराच्या दिशेने धाव घेतात मात्र येथे विशेषता कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये ते जखमी होत असतात अशावेळी काही जागरूक शेतकरी किंवा नागरिक हे जखमी अवस्थेत पडलेल्या वन्य प्राण्यांबद्दलची माहिती वनविभागाला देत असतात मात्र वन विभागाच्या काही बेजबाबदार कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे त्या वन्य प्राण्यांचा उपचारा अभावी जीव जात असतो तेव्हा अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या नागरिकांमध्ये जोर धरत आहे.
रामटेक वनपरिक्षेत्रात नुकत्याच घडलेल्या दोन घटना चर्चेचा विषय ठरले आहेत. रामटेक वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खापरखेडा तथा कन्हान परिसरात विशेषतः कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये हरिण व हरणाची पिल्लू जखमी झाले असता काही जागरूक नागरिकांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली.
मात्र वनविभागाचे कर्मचारी जखमी वन्यप्राण्यांना उपचारासाठी तातडीने हलवु शकले नाही आणि यातच त्या वन्यप्राण्यांचा मृत्यु झाला. या घटनांनंतर गावपरिसरातील नागरीकांमध्ये वनकर्मचाऱ्यांप्रती मोठा रोष वाढला आहे. कुठे एखादी वन्यप्राण्यांच्या जखमी होण्याबद्दलची घटना घडल्यावर घटनास्थळी कधी वनकर्मचारी लवकर पोहोचत नाही तर कधी त्यांचे वाहन उपलब्ध नसते तेव्हा अशावेळी नेमके उपचारास उशीर झाल्याने त्या जखमी वन्य प्राण्यांचा मृत्यू होत असतो.
एकीकडे शासन वनविभागासह वन्यप्राण्यांच्या सोयी सुविधेसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करीत असते तर दुसरीकडे त्यांनीच नियुक्त केलेले काही बेजबाबदार, अकार्यक्षम कर्मचारी शाशनाच्या उदात्त धोरणाला फाटा देत असतात.
तेव्हा ‘ आपल्या कडक नियमांसाठी चर्चीत असलेले वनविभाग ‘ आता वनविभागाच्या अशा काही बेजबाबदार तथा अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कोणती कडक कारवाई करते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करणार – आर.एफ.ओ. भगत
याबाबद रामटेक वनपरीक्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांना विचारणा केली असता ‘ याबाबतीतील दोन घटना नुकत्याच घडल्या आहे. मी दोन्ही घटनांची सखोल चौकशी करतो व यात वनविभागाचे जेही कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल ‘ असे अनिल भगत यांनी सांगितले.