आकोट- संजय आठवले
आकोट : वडिलोपार्जित चार एकर जमिनीवर हक्क सांगणाऱ्या लहान भावाला शेतात एकटा गाठून वडील भावाने आपल्या मुलाच्या मदतीने पाईप व कुऱ्हाडीचे वार करून ठार केल्याची घटना आकोट तालुक्यातील देऊळगाव येथे घडली आहे. घटनेतील आरोपी पिता-पुत्रांना आकोट ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासात चतुर्भुज करून आकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आकोट तालुक्यातील देऊळगाव येथे बापूराव गहले हे आपल्या आपला थोरला मुलगा सुरेश याचे कडे राहत होते. त्यांची चार एकर जमीनही त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचेच नावे केली. त्यामुळे ही शेती हाच मुलगा कसत होता. त्यावर त्यांचा धाकटा मुलगा ज्ञानेश्वर याचा आक्षेप होता. त्यालाही या जमिनीत हिस्सा हवा होता. त्यामुळे दोन्ही भावांमध्ये अदावत होऊन वाद झाला. प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. यादरम्यान सदर जमीन थोरला मुलगाच कसत होता.
अशातच या पेरलेल्या शेतात ज्ञानेश्वर हा फवारणीकरिता गेला होता. आजूबाजूस कुणीच नव्हते. ही संधी साधून सुरेश गहले यांनी आपला मुलगा शुभम याचे मदतीने ज्ञानेश्वर याचेवर कुऱ्हाड व पाईपने हल्ला चढवून त्याला जबर जखमी केले. त्यानंतर दोघेही पिता-पुत्र निघून गेले. ज्ञानेश्वरला चालता येत नसल्याने तो वेदनांनी विव्हळत तिथेच पडून होता. इतक्यात शेतात आलेल्या एका इसमाने हे दृश्य पाहिले. त्यांना लगेच ज्ञानेश्वरच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
ही माहिती मिळताच ज्ञानेश्वरच्या कुटुंबीयांनी शेतात जाऊन त्याला परस्पर अकोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ह्याच कालावधीत सुरेश गहले व त्यांचा मुलगा शुभम हे दोघेही पैसे घेऊन दवाखान्यात गेल्याचे व ज्ञानेश्वरला वाचविण्याची डॉक्टरला विनंती केल्याचे सांगण्यात येते. परंतु ज्ञानेश्वरचा मृत्यू झाल्याने हे पिता पुत्र तेथून फरार झाले. या मृत्यूची खबर अकोला पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी ही खबर आकोट ग्रामीण पोलिसांना कळविली.
त्यानंतर मृतकाची पत्नी अर्चना ज्ञानेश्वर गहले हिने फिर्याद दाखल केली. त्यावरून आकोट ग्रामीण पोलिसांनी सुरेश गहले वय ५४ वर्षे व त्यांचा मुलगा शुभम वय २७ वर्षे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दोघांचे शोधार्थ पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली. अखेर या दोघांना नागपूर रेल्वे स्थानकावरून तब्यात घेतले गेले. त्यानंतर रितसर कारवाई करून आरोपींना आकोट न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघांनाही २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे.