Friday, October 25, 2024
Homeराज्यधक्कादायक...तहसीलदारांचा आदेश मानण्यास तहसील कार्यालयाचा चक्क नकार…आकोट मंडळ अधिकाऱ्याकडे दोन अतिरिक्त प्रभार...

धक्कादायक…तहसीलदारांचा आदेश मानण्यास तहसील कार्यालयाचा चक्क नकार…आकोट मंडळ अधिकाऱ्याकडे दोन अतिरिक्त प्रभार कायम…अन्य मंडळ अधिकारी कर्तव्य शून्य असल्याची पावती….

आकोट- संजय आठवले

आकोट मंडळ अधिकारी यांचे कडील पणज मंडळाचा प्रभार अन्य मंडळ अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करणेकरिता तहसीलदार आकोट यांनी काढलेला आदेश मानण्यास तहसील कार्यालयानेच नकार दिला असून आकोटचे वर्तमान मंडळ अधिकारी यांचेकडे दोन मंडळांचे प्रभार कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आकोट मंडळ अधिकारी वगळता तालूक्यातील अन्य सारे मंडळ अधिकारी कर्तव्यशून्य असल्याची पावती आकोट तहसील कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे या कर्तव्य शून्य मंडळ अधिकाऱ्यांचे प्रभारही आकोट मंडळ अधिकाऱ्याकडेच का दिले जात नाहीत? असा सवाल नागरिक करित आहे

आकोट मंडळाचे वर्तमान मंडळ अधिकारी निळकंठ नेमाडे हे आकोट तालुक्यातीलच अकोलखेड मंडळाचे पूर्णवेळ मंडळ अधिकारी होते. सप्टेंबर २०२२ पासून पणज मंडळाचा प्रभारही त्यांचेकडेच देण्यात आलेला होता. परंतु जीवनात एकदा तरी आकोट मंडळावर अधिपत्य गाजविण्याची जबर महत्त्वाकांक्षा नेमाडे यांची होती. ती फलद्रूप करणेकरिता राजकीय संबंध जोडण्यात वस्ताद असलेल्या नेमाडे यांनी आमदार भारसाखळे यांची मर्जी चांगलीच संपादन केली. अन्य ठिकाणी असतानाही आकोटच्या तत्कालीन आमदारांशी नेमाडेंचे घनिष्ठ संबंध होतेच. भारसाखळे यांची मर्जी संपादन करून त्यांनी आकोट मंडळात वर्णी लावून आपली स्वप्नपूर्ती केली.

परंतु आकोट मंडळ मिळाल्यावरही अन्य मंडळे ताब्यात ठेवण्याचा त्यांचा हव्यास पूर्ण झाला नाही. त्याकरिता त्यांनी आमदार भारसाखळे यांच्या राजकीय वजनाचा वापर करून अकोलखेड व पणज मंडळांचा प्रभार आपल्याच पदरात पाडून घेतला. वास्तविक तहसीलदार अक्षय रासने यांनी क्र.सा. आस्था/ महसहा / कावी- ४६८/ २०२३ हा आदेश दि. २४.०५.२०२३ रोजी पारित केला. या आदेशान्वये आकोटसह नेमाडेंचा अतिशय प्रिय आणि वसुलीची खाण असलेल्या अकोलखेड मंडळाचा प्रभार रासने यांनी नेमाडेकडे सोपविला. परंतु पणज मंडळाचा प्रभार आसेगाव मंडळ अधिकारी एस. एस. साळवे यांचेकडे देण्यास आदेशित केले.

हा आदेश पारित केल्यानंतर तहसीलदार रासने हे बदलीवर गेले. आणि नेमाडेंच्या राजकीय वरदहस्तामुळे तहसील कार्यालयाने हा आदेश चक्क दप्तरात गुंडाळून ठेवला. आज रोजी निळकंठ नेमाडे यांचेकडे आकोटसह अकोलखेड व पणज मंडळांचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे. नेमाडे यांना असलेल्या राजकीय पाठबळामुळे आकोट तहसील अंतर्गत असलेला एकही अधिकारी वा कर्मचारी हूं का चूं करण्यास तयार नाही. परंतु दुसरीकडे “मी स्वतःच्या उत्तम कार्यशैलीमुळे आकोटला आलो. मला कुणाचेच आशीर्वाद नाहीत” असे नेमाडे छाती फुगवून सांगत आहेत. असे असले तरी नेमाडे हे आमदार भारसाखळे यांचे हस्तक असल्याचे साऱ्यांनाच ठाऊक आहे.

त्यामुळेच हे सारे कळत असल्याने तत्कालीन तहसीलदार यांचे आदेशाचे पालन करण्यास कुणीच धजावत नाही. परंतु दस्तूर खुद्द तहसीलदारांचा आदेश चक्क तहसील कार्यालयानेच ठोकरल्याने नागरिकांमध्ये याचे प्रतिकूल पडसाद उमटत आहेत. त्यामुळेच तहसीलदार यांचा आदेश तहसील कार्यालयच मानित नसेल तर विविध प्रकरणांमध्ये तहसीलदार यांनी दिलेले आदेश नागरिकांनीच का मानावेत? अशी पृच्छा नागरिक करीत आहेत. सारांश तहसीलदारांचा हा आदेश पाळला न गेल्याने तहसील कार्यालयाची नाचक्की होत आहे. सोबतच तहसीलदार पदाची जरबही कमी होऊ लागली आहे.

या सोबतच आकोट तालुक्यात फक्त निळकंठ नेमाडे हेच अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ, सक्षम आणि कर्तबगार असून अन्य सारे मंडळ अधिकारी बेकार व अक्षम असल्याची नागरिकांची धारणा होत आहे. आणि ही धारणा तहसील कार्यालयाने तहसीलदार यांचा आदेश डावलल्याने होत आहे. त्यामुळेच मग अशा अक्षम मंडळ अधिकाऱ्यांवर खर्च करण्याऐवजी शासनाने आकोट तालुक्यातील सर्वच मंडळांचा कारभार आमदार भारसाखळे यांचे कृपापात्र निळकंठ नेमाडे यांचे कडेच सोपावावा असे बोलल्या जात आहे. काही लोकांनी अशा आशयाची निवेदने जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी आकोट यांना देण्याचा मनसूबाही व्यक्त केल आहे.

येथे उल्लेखनीय आहे कि, आकोट सूतगिरणीचा फेरफार व सातबारा नोंद पूर्व उपविभागीय अधिकारी यांनी रद्द केली. असे न करणे बाबत दिवाणी न्यायालयाने मनाई केलेली होती. तरीही या आदेशावर अंमल करणेकरिता निळकंठ नेमाडे यांनी जीवाचे रान केले होते. अन्य मंडळातील मंडळ अधिकारी व तलाठी यांनाही तगादा लावून या आदेशावर अमल करण्यास सांगितले होते. यावरून नेमाडे हे जबरदस्त कर्तव्यदक्ष? असल्याचे दिसून आले होते. परंतु अकोलखेड व पणज मंडळाचा प्रभार सोडणेकरिता मात्र त्यांची कर्तव्य दक्षता रानात चरावयास गेल्याचे जाणवते.

आकोट महसूल विभागाच्या अब्रूची लक्तरे अशा प्रकारे वेशीवर टांगली जात असतानाही वर्तमान उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आकोट हे नेमाडेबाबत योग्य कार्यवाही करण्यास धजावत नाहीत यावरून नेमाडेंची जरब व राजकीय पाठबळाचा कयास लावता येतो. याबाबत कानावर आले आहे कि, उपविभागीय अधिकारी यांनी आमदार भारसाखळे यांच्याशी नेमाडेंबाबत चर्चा केली आहे. परंतु शासनापेक्षा भारसाखळे यांच्याशी अधिक एकनिष्ठ असल्याने भारसाखळे यांनी नेमाडेंबाबत ‘जैसे थे’ चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारसाखळे हे ही तहसीदारांच्या आदेशाला केवळ कागदाचा चिटोरा मानित असल्याचे दिसून येते. अशा स्थितीमुळे आमदार भारसाखळे आपल्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांना आपल्या वाड्यातील सालगडी मानतात कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अनुषंगाने एक मजेदार किस्सा ऐकण्यात आला. जो येथे उल्लेखनीय आहे. मागील पंचवार्षिक कालखंडात आमदार भारसाखळे यांचे दर्यापूर येथील घरी एक मंगल सोहळा पार पडला. या सोहळ्यात आकोटचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांना पाहुण्यांची सरबराई करताना आकोटातील अनेकांनी पाहिले असल्याची चर्चा आहे. तोच कित्ता आजही गिरविला जात असल्याचे जनमानसात बोलले जात आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: