नांदेड – महेंद्र गायकवाड
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सीबीएससी व आयसीएससी बोर्डातून भार्गव करिअर अकॅडमीचा इयत्ता 5 वीतील विद्यार्थी यशराज नामदेव देशमुख याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यशराजने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी भार्गव करिअर अकॅडमी येथे केली आहे. यशराजने गणित विषयात 100 पैकी 100 गुण, मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयात 50 पैकी 50 गुण मिळवले आहेत. यशराजला अकॅडमीचे संचालक भार्गव राजे, भास्कर रेड्डी व इतर तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या अगोदर यशराजने ऍलन टॅलेंटेक्स परीक्षेत देशात तिसरा, सिल्वरझोन, युनिफिल्ड कॉन्सिल, एसओएफ, आयएसटीएसई ऑलिम्पियाड यासह अनेक परीक्षेत त्याने यश संपादन केले आहे. या सर्व परीक्षांची तयारी करण्यासाठी सह्याद्री इंग्लिश स्कूल लोहाचे संचालक सुदर्शन शिंदे व मुख्याध्यापक नंदकिशोर मेकाले यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
यशराजच्या या यशाबद्दल आजोबा माधवराव देशमुख, मामा दीपक शिराळे, बाबुराव किडे, आयआयबी संचालक दशरथ पाटील यांनी अभिनंदन केले. यशराजचे मुळगांव कारेगांव ता.लोहा असून ग्रामीण भागातून असूनही सीबीएससी व आयसीएससी बोर्डातून 5 वी स्कॉलरशीप परीक्षेत राज्यात प्रथम आल्याबद्दल नांदेड जिल्ह्यासह राज्यभर यशराजचे कौतुक होत आहे.