मूर्तिजापूर शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. राजेश कांबे यांची सून काजल संकेत कांबे (24) हिने दिनांक 20 जून रोजी रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाला चार दिवस उलटून गेल्यावर काजल हिचे वडील संजय शर्मा यांनी काजलच्या सासरच्या मंडळीवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पति संकेत राजेश कांबे (वय ३०), सासरे राजेश रामदास कांबे (वय ५२), अनुश्री राजेश कांबे (वय ५०), साक्षी राजेश कांबे (वय २५) या चौघांवर शहर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.
मृत काजलचे वडील संजय फूलचंद शर्मा (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काजल हिचे संकेतसोबत १६ फेब्रुवारी २०१८ रोजी आंतरजातीय विवाह झाला. कांबे कुटुंबीयांनी सुरुवातीला काही दिवस चांगले वागविले. लग्नाचे काही दिवसानंतर तिच्या सासरच्यांनी ‘तू’.. गरीब घरची आहे, दुसऱ्या जातीची आहे. आमचे मनाप्रमाणे लग्न झाले नाही, या कारणांवरून सतत अमानुषपणे मारहाण करून तिला माणसिक व शारीरीक त्रास द्यायचे. काजलचं जगणं असाह्य करून टाकले. तसेच संकेत लग्नानंतर काजल हीला सतत म्हणायचा की ‘मी’ खूप सूंदर आहे, मला लग्नासाठी कोणतीही मूलगी मिळणार. तरीही मी तूझ्यासोबत लग्न केले आहे, असे वारंवार बोलून डिवचत होता. तसेच सासरचे लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालून तिला शिवीगाळ करून त्रास द्यायचे. म्हणून काजलनं रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली असल्याचे तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
काजलच्या लग्नाला ५ वर्षे झाली होती. तिला दोन गोंडस मुले आहेत. तिच्या आत्महत्येन शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 20 तारखेला आत्महत्या करायला गेली होती, तेव्हा जिथे रेल्वेचे इंजिन उभे राहतं तिथेही ती गेली, परंतु तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला हटकले अन् तिथूनही निघून गेली. रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर एका नाल्याजवळ म्हणजेच चिखली गेटच्या रेल्वे रुळावर गेली. तिथे आपली स्कुटी उभी करून चप्पल ठेवून दिली. अन् पुणे- अमरावती सुपर फास्ट रेल्वे येताच तिने रेल्वे समोर उडी घेतली. या अपघातात काजल गंभीर जखमी झाल्याने जागीच मरण पावली. दरम्यान आता या प्रकरणात काजलच्या सासरच्यांवर ४९८ अ,३०६, ३४ या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन यादव करीत आहेत.