Ind vs Pak -आशिया चषक 2022 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 19.5 षटकांत केवळ 147 धावा करू शकला. 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले.
भारताकडून विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. केएल राहुलच्या रूपाने भारतीय संघाने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. त्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 46 चेंडूत 49 धावांची भागीदारी झाली. विराट ३५ आणि रोहित १२ धावा करून बाद झाला. सूर्यकुमारने जडेजासोबत चौथ्या विकेटसाठी 31 चेंडूत 36 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार १८ धावा करून बाद झाला.
यानंतर हार्दिकसह जडेजाने भारताला विजयाच्या जवळ नेले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 29 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात 35 धावा काढून जडेजा बोल्ड झाला. मात्र हार्दिकने षटकार ठोकत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने रविवारी आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेतील बहुचर्चित सामन्यात पाकिस्तानला 147 धावांत गुंडाळले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो भुवनेश्वर आणि हार्दिकच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले.
भुवनेश्वरने चार षटकांत २६ धावा देऊन चार बळी घेतले ज्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (१०) याच्या विकेटचा समावेश होता. त्याचवेळी हार्दिकने चार षटकांत २५ धावा देत तीन बळी घेत पाकिस्तानी मधल्या फळीचे कंबरडे मोडले. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 33 धावांत दोन बळी घेतले. भारत-पाकिस्तान सामन्यात खेळण्याचा अर्शदीपचा हा पहिलाच अनुभव होता. भारताच्या सर्व दहा विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या.