संजय आठवले आकोट
तेल्हारा तालुक्यातील अटकळी मनब्दा मार्ग लगतच्या विद्रूपा नदीपात्रातून एका रस्ता कंत्राटदाराने खोदून नेलेल्या मातीमुळे निर्माण झालेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा करून अंत झाल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे. ह्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेबाबत हकीकत अशी की, रविवार दिवशी शाळेला सुट्टी असल्याने मनब्दा येथील इयत्ता सातवीत शिकणारे ऋषी संतोष सुरळकर व सागर संतोष दांडगे ही दोन 14 वर्षीय बालके आपल्या एका दहा वर्षीय मित्रासोबत विद्रूपा नदीवर आंघोळीसाठी गेली. ह्या चिमुकल्यांचे पालक शेतमजूर असल्याने ते शेतात कामावर गेलेले होते. त्यामुळे ह्या लेकरांना हटकणारे कुणीच नव्हते. म्हणून ही बालमंडळी बिनधास्तपणे विद्रूपा नदी वर आंघोळीसाठी गेली. तिथे गेल्यावर त्यांना पाणी दिसले. परंतु त्या पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.
विशेष म्हणजे या बालकांना पोहता येत नव्हते. तरीही ऋषी व सागर या दोघांनी पाण्यात उड्या मारल्या. परंतु तिसरा लहानगा मात्र पाण्याबाहेरच थांबला. उड्या मारल्यावर ऋषी व सागर बराच वेळ बाहेर न आल्याने त्या तिसऱ्या बालकाने आरोळी मारीत गावाकडे धाव घेतली. त्याचे ओरडणे बाजूला गुरे चालणाराने ऐकले. त्याने ताबडतोब आरडाओरड करून गावातील लोकांना माहिती दिली. ही घटना येथील युवा कार्यकर्ता मुन्ना पाथरीकर ह्याला कळताच गावातील युवकांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. लगेच युवकांनी पाण्यात उड्या मारल्या. परंतु त्यांचे हाती ऋषी व सागर चे शवच लागले. गावकऱ्यांना पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे काळाने आपला डाव साधला आणि ऋषी व सागर या चिमुकल्यांचा अंत झाला. हे शेव बाहेर काढून तेल्हारा पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी ताबडतोब घटनास्थळी पोलीस पथक पाठवून पुढील कार्यवाही केली.
विद्रूपा नदीत पडलेल्या ह्या खोल खड्ड्या बाबत अधिक माहिती घेतली असता, धक्कादायक बाब समोर आली आहे. सूत्रांनी सांगितले की, अडसूळ ते देवरी पर्यंतचा रस्ता करण्यासाठी या मार्गाची कंत्राटदार असलेल्या सुधीर कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीने या ठिकाणची पिवळी माती खोदून रस्त्याचे उपयोगात आणली. दररोज ४० ट्रक लावून प्रचंड प्रमाणात ही माती खोदून नेली. परिणामी या ठिकाणी ४०० ते ५०० फुट लांब व ९० ते १०० फूट रुंद असा प्रचंड मोठा खड्डा निर्माण झाला आहे.
मात्र याबाबत नियमांची काहीही माहिती नसल्याने गावातील लोकांना हे माती उत्खनन जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत होत असल्याची थाप मारली गेली. ह्या कंत्राट दाराने ही माती नेण्यासाठी कोणताही शासकीय परवाना घेतलेला नव्हता. त्याने शासकीय भरणाही भरला नव्हता. विशेष म्हणजे रस्त्याकरिता मुरमाऐवजी ही माती वापरली गेली. गावातीलच बडी मंडळी कंत्राटदाराला सामील असल्याने त्याच्या विरोधात कुणीही काहीही बोलले नाही. यावरून आपल्या अल्पशा लाभाकरिता या कंत्राटदाराने या परिसरातील लोकांसाठी मौत का कुवा़ँ तयार करून ठेवल्याचे दिसत आहे.