मुंबईत शिकत असलेल्या अकोल्यातील 18 वर्षीय विद्यार्थीवर अतिप्रसंग करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल उघडीस आली. हत्यारा दुसरा तिसरा कोणी नसून तिच्याच वसतिगृहातील सुरक्षा रक्षक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर कालच त्या सुरक्षा रक्षकाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील ही घटना असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेची अकोल्यात माहिती होताच शहरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणी ही अकोल्यातील एका पत्रकाराची मुलगी असून ती मुंबईतील वांद्रे येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयात पोलिटेक्निकलचे शिक्षण घेत होती.
मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये ही तरुणी राहात होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी तपास केला असता, ती राहत असलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे अन्य विद्यार्थिनींच्या निदर्शनास आले. त्यामुळे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दरवाजा खोलून घरात पाहिले असता ती विद्यार्थिनी मृतावस्थेत आढळून आली.
तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून याबाबत कळविण्यात आले. निपचित पडलेल्या तरुणीला पोलिसांनी नजीकच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. अतिप्रसंग करून तिची गळा दाबून हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याबाबत मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ओढणीने गळा आवळून या तरुणीची हत्या करण्यात आली. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्यामुळे बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा संशय असून, शवविच्छेदन अहवालानंतर लैंगिक अत्याचार झाला होता का, ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, चर्नीरोड रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी एका व्यक्तीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती. तो वसतीगृहाचा सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया असावा, असा संशय पोलिसांना होता. कनोजियाच्या वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली असून सीसीटीव्हीवरून तो आरोपीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुलीची हत्या करून कनोजियाने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. त्याच्या खिशात दोन चाव्या सापडल्या आहेत. गेल्या १५ वर्षांपासून अधिक काळ तो वसतिगृहात कामाला होता.
वसतिगृहातील सुरक्षा रक्षक हा नेहमी तिला त्रास द्यायचा, याबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितले होते. तर ती येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ती गावी जाणार होती. त्यासाठी तिने रेल्वेचे तिकीटही काढले होते. मात्र त्याआधीच तिची हत्या झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.