नरखेड – अतुल दंढारे
विद्यार्थी, शिक्षक व समाजाकरीता शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण क्षेत्रात चळवळ म्हणून कार्य करणाऱ्या वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारा काटोल तालुक्यातून उगम पावणाऱ्या आणि हिंगणघाट येथे वर्धा नदीला जाऊन मिळणाऱ्या वेणा नदीचा अभ्यास करण्यासाठी वेणा नदी शोधयात्राचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरातत्तव अभ्यासक तथा वेध प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष डॉ मनोहर नरांजे यांचे मार्गदर्शनाखाली आणि पक्षी व फुलपाखरू अभ्यासक डॉ.अश्विन किनारकर यांचे संयोजनांतर्गत २८ मे ते १ जून या कालावधीत ही शोधयात्रा संपन्न होणार आहे. मानवी संस्कृतीचा उगम आणि विकास सरितांच्या साथीने आणि त्यांच्या सानिध्यातच झालेला आहे.
जीवनदायिनी सरीता नेहमीच मानवासह समस्त सजीवसृष्टीचे पालनपोषण आणि संवर्धन करीत आलेल्या आहे. पण विकासाच्या विपरीत व्याख्यामुळे या नद्यांचा जीवनप्रवाह विषाक्त होऊन अवरुद्ध झालेला आहे.
नदी म्हणजे जणू लोकमाताच. स्थानिक इतिहास, संस्कृती, प्रकृती, पर्यावरण, भाषा, लोकजीवन, समारंभ, उद्योग, शिल्प, स्थापत्य, कला इत्यादी अंगांनी भवतालास जाणून घेण्यासाठी नदीस जाणून घेणे गरजेचे आहे.
वेणा नदी ही परिसरातील एक प्रमुख नदी. वेणानदी शोधयात्रा या उपक्रमाच्या माध्यमातून वेणा नदीस जाणून घेण्याचा एक प्रयत्न वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित करण्यात आलेला आहे. या शोधयात्रेत पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.मनोहर नरांजे, डॉ.अश्विन किनारकर, खुशाल कापसे, वसंत गोमासे, ओंकार पाटील, शंकर जीवनकर, डॉ.कीर्ती पालटकर, वासंती गोमासे, डॉ.शिल्पा सूर्यवंशी यांनी केले आहे.