सांगली – ज्योती मोरे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पहिले नांगरट साहित्य संमेलन रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी छत्रपती शिवाजी विद्यापीठातील वि स खांडेकर भाषा भवन सभागृहात होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य डॉक्टर विठ्ठल वाघ ,उद्घाटक वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे असून सदर संमेलनामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर आ.ह. साळुंखे,दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव,ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांना स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवाय शेतकरी प्रश्नांचे कला साहित्य माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब या विषयावर परिसंवाद ही होणार आहे सदर परिसंवादाचे अध्यक्ष दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले हे आहेत .या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे ज्येष्ठ साहित्यिक विजय चोरमारे ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील ज्येष्ठ लेखक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर जालिंदर पाटील हे सहभागी होणार आहेत.
याचबरोबर निमंत्रितांचं कवी संमेलन ही होणार असून या संमेलनाचे सुरेश शिंदे हे अध्यक्ष असणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे .यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.