संजय आठवले आकोट
संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. आपल्यासाठी वर्षभर राब राब राबणाऱ्या वृषभ राजाच्या ऋणाची परतफेड करण्याकरिता बळीराजा पोळा अतिशय उत्साहाने साजरा करीत असतो. याच पार्श्वभूमीवर आकोट शहरामध्ये आगळावेगळा असा गाढवांचा पोळा साजरा केला जातो. ज्याप्रमाणे बैल शेतकऱ्यांसाठी राबराब राबून त्यांची घरगृहस्थी चालवितो त्याचप्रमाणे गाढवही वर्षभर राबून आपल्या मालकांच्या कुटुंबाचे भरण पोषण करतो. त्याच्या याच ऋणाची आठवण ठेवून आकोट शहरातील कुंभार समाज बांधव गाढवांचा पोळा दरवर्षी साजरा करतात.
यावर्षीही तो अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवशी बैलांप्रमाणेच गाढवांची आंघोळ घातली जाऊन त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या अंगावर झूली चढवल्या जातात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातल्या जातो. नंतर त्यांचा पोळा भरण्यात येतो. या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्रित येऊन गाढवां प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. दुसरे दिवशी या गाढवांना आकोट शहरातील नंदी पेठ परिसरातील नंदिकेश्वर मंदिरात नेले जाते. तिथे नंदिकेश्वरा चे पूजन करून नंतर ह्या गाढवांना घरी परत आणल्या जाते.
यंदा हा पोळा साजरा होत असताना कुंभार समाज बांधवांच्या चेहऱ्यावर व्यथा ही दिसत होती. याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना समजले की, गत दोन महिन्यांपासून कुंभार समाज बांधव गाढव चोरीमुळे अतिशय त्रस्त झालेले आहेत. निकटच्या आंध्र प्रदेश या राज्यातील गुंटूर आणि विजयवाडा या जिल्ह्यांमध्ये या गाढवांची तस्करी केली जात आहे.चक्क आकोट शहरात येऊन आंध्र प्रदेशातील हे तस्कर गाढव चोरून नेत आहेत. पोलिसात तक्रार दिली जाते. परंतु त्यावर कारवाई मात्र काहीच होत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गाढवाची नैसर्गिक प्रवृत्ती ही फिरण्याची असल्याने त्यांना एका जागी बांधून ठेवता येत नाही. त्यामुळे ते संपूर्ण शहरात फिरतात.
अशा स्थितीत ही चोरमंडळी या गाढवांना एकांत स्थळी हाकून नेतात. आणि तिथे त्यांना वाहनात टाकून नेल्या जाते. गाढवाच्या या चोरीकडे नागरिक विशेषता लक्ष देत नसल्याने या चोरांना अतिशय सहजतेने ही चोरी करता येते. त्यामुळे या चोरांचा थांग पत्ताच लागत नाही. एक-दोनदा आकोट शहरातील काही कुंभार समाज बांधव आंध्र प्रदेशात गेले. परंतु तिथे कोणतीही मदत न मिळाल्याने त्या चोरांबाबत कोणतीही कार्यवाही न करता ते खाली हात परत आले. गत दोन महिन्यात आकोट शहरातील ऊकर्डाजी कंडाळे यांची आठ गाढवे,जनार्दन उंदरे यांची दोन गाढवे, शांताराम लोणी यांची चार गाढवे, बंडू कोमटवार यांची नऊ गाढवे,प्रकाश कंडाळे यांचे एक गाढव चोरीस गेलेले आहे.