रामटेक – राजु कापसे
किरणापूर, दिनांक: २६/८/२०२२ रामटेक तालुक्यातील किरणापूर (काचुरवाही) येथे बैलपोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘एक गाव एक पोळा’ समिती तर्फे जगाला अन्नधान्य मिळावं म्हणून शेतात राबराब राबणाऱ्या बैलजोडीचे पूजन व त्यांचे मालक असलेल्या बळीराजाला आदरपूर्वक शेला, टोपी, श्रीफळ प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी मार्गदर्शन करताना, “शेतकऱ्यांच्या कष्टाची समाजाने व शासनाने जाण ठेऊन त्यांचे हित जपले पाहिजे” असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे सरपंच श्रीकृष्ण उईके यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने सुरेश कुथे, उदाराम हूड, शेषराज कुथे, हरीश हूड, घनश्याम ठाकरे, कपिल देवगडे, शुभम कुथे, श्याम कडू, टिकाराम हूड, चंद्रभान कुथे, प्रेमदास कडबे, रविंद्र कडू उपस्थित होते.
मागील पाच वर्षांपासून ‘एक गाव एक पोळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून किरणापूर येथे ग्राम ऐक्याचे प्रयत्न केले जातात. सर्व गावकऱ्यांच्या मदतीने पोळ्याचे आयोजन केले जात असल्याने शेकडो तरुण व आबालवृध्द कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. अतिशय आनंदाच्या वातावरणात बैल पोळा सण साजरा करण्यात आला.