मुंबई – गणेश तळेकर
मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक व अभिनेते संतोष पवार आता ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर घेऊन आले आहेत. नव्या दमाचे तब्बल १३ कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासोबत स्वतः संतोष पवार या नाटकात विविध भूमिका रंगवत आहेत.
वास्तविक, संतोष पवार यांनी ५ वर्षांपूर्वी हे नाटक रंगभूमीवर आणले होते. तेव्हा त्याचे १७४ प्रयोग झाले होते. परंतु त्या नाटकाच्या निर्मात्यांचे अकस्मात निधन झाल्याने या नाटकाचे प्रयोग थांबले. त्यानंतर कोरोनाचा फटका रंगभूमीला बसला. त्यावेळी थांबलेले हे नाटक आता संतोष पवार पुन्हा एकदा रंगभूमीवर घेऊन आले आहेत.
सौ.मानसी केळकर यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य या नाटकाला लाभले आहे.
‘सोहम प्रॉडक्शन्स’ निर्मित व ‘भूमिका थिएटर्स’ प्रकाशित ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १२ मे २०२३ रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात प्रेक्षकांच्या हास्यकल्लोळात आणि टाळ्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला.