आकोट – संजय आठवले
तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या हिवरखेड शहरातील दोन सराफ दुकानांवर दरोडा घालून चोरट्यांनी साडेतीन किलो चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांच्या तपासाकरिता पोलीस पथके रवाना झाली असून घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.
या घटनेने हिवरखेड शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांची ही टोळी परराज्यातील अथवा पर जिल्ह्यातील असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. घटनेची हकीकत अशी कि, हिवरखेड शहरातील मुख्य रस्त्यालगत भवानी प्लाझा नामक व्यापारी संकुल आहे. या संकुलात अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत.
दि.७.५.२०२३ चे रात्री अंदाजे दोन ते तीन वाजता चे दरम्यान वेदप्रकाश वर्मा यांचे ओम ज्वेलर्स आणि मनोज लोणकर यांचे साक्षी ज्वेलर्स ही दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. त्यात वर्मा यांचे दुकानातून २ लक्ष ५ हजाराचे तर लोणकर यांचे दुकानातून १ ते १.५० लक्ष रुपये किमतीचे साडेतीन किलो चांदीचे दागिने लंपास करण्यात आले.
हा प्रकार घडल्याचे पहाटे ध्यानात आल्यानंतर घटनेची तक्रार हिवरखेड पोलिसात करण्यात आली. पंधरा दिवसांचे दीर्घ रजेनंतर कर्तव्यावर परतलेल्या ठाणेदार विजय चव्हाण यांनी घटनेची दाखल घेऊन चोरट्यांचे शोधार्थ पोलीस पथके रवाना केली आहेत.
त्यासोबतच घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच तन्नू सोनी यांचे श्री साई ज्वेलर्स हे दुकानही फोडण्याचा चोरट्यांनी प्रयास केला. परंतु चैनल लॉक तोडण्यात त्यांना अपयश आल्याने हे दुकान बचावले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वाहन क्रमांक नसलेल्या पांढऱ्या बोलेरो वाहनाने हे चोरटे शहरात आले होते. ही गाडी व दुकानांची कुलपे हाताळताना तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये टिपल्या गेले आहेत. हा दरोडा टाकण्यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील कुत्र्यांना काहीतरी अमली पदार्थ खाऊ घातले असल्याने दुसरे दिवशीही ही कुत्री सुन्नावस्थेतच पडलेली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे दरोड्याचे तीन ते चार दिवसांपूर्वी दोन ते तीन अनोळखी महिला मनोज लोणकर यांचे साक्षी ज्वेलर्स या दुकानात आल्या होत्या. त्यांनी लोणकर यांच्याशी बऱ्याच गप्पाही मारल्या होत्या. परंतु कामाचे व्यापात या घटनेकडे लक्ष दिले गेले नाही. मात्र यावरून चोरट्यांनी बरेच दिवसांपासून ह्या दुकानांची रेकी केल्याचे दिसून येते.
यातच हिवरखेडचे ठाणेदार विजय चव्हाण हे पंधरा दिवसांच्या दीर्घ रजेवर गेले होते. त्यांचे जागी प्रभारी म्हणून धनंजय सहारे हे आले होते. नेमके दरोड्याच्या दिवशी चव्हाण यांचा रजा कालावधी समाप्त झाला होता. आणि सहारे हे त्यांचे कर्तव्यावर परतणार होते. दरोडेखोरांनी नेमका हाच मोका साधला. यावरून दरडोखोरांनी पोलिसांच्या हालचालीचीही खबर ठेवली असल्याचे दिसते.
या घटनेने हिवरखेड शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्याकरिता हिवरखेड पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली आहे. या सोबतच अशा घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्याचे दृष्टीने हिवरखेड प्रवेशद्वारा जवळील भोपळे संकुलापाशी पोलीस चौकी उभारण्याचीही मागणी होत आहे.
ही चौकी बांधण्याकरिता भोपळे संकुल चे संचालक श्यामशील भोपळे यांनी आपली जागा विनामूल्य देण्याची तयारी दर्शविली आहे. या ठिकाणी उल्लेखनीय आहे कि, बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे हद्दीत येणाऱ्या ग्राम म्हैसपूर येथे सद्यस्थितीत शिव महापुराण कथा सुरू आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची ये जा सुरू आहे.
अशा गर्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरणाऱ्या तब्बल दहा महिलांना अकोला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. त्यांचेकडून १ लक्ष ८२ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. यातील काही महिला राजस्थान व मध्यप्रदेश या प्रांतातील असून काही महिला नागपूर व वर्धा जिल्ह्यातील आहेत.
काही दिवसांपूर्वी हिवरखेड येथे रेकी करण्याकरता आलेल्या महिला या अटक केलेल्या महिलांमध्ये सामील आहेत काय? याची पडताळणी होणे गरजेचे आहे.