चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली,दि.24— महाराष्ट्र ही क्रांती घडवून आणणाऱ्या चळवळी माणसांची भूमि आहे. एकदा स्वातंत्र्य संग्रामात सिंहाचा वाटा उचलला होता. आता भारताला जागतिक महाशक्ती बनविण्याचा विडा उचला, असे भावनिक आणि कळकळीचे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विद्याथ्र्यांनी खचाखच भरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मराठी अधिकाऱ्यांना केले.
देशभरातील मराठी प्रशासकीय अधिका—यांची संस्था ‘पुढचे पाउल’तर्फे 2021 मध्ये सनदी सेवा परिक्षा उत्तीर्ण विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपाल बोलत होते.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि लोकपाल सदस्य डी. के. जैन, परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव विश्वास संपकाळ, राज्यपालांचे प्रधान सचिव आनंद पाटील आणि भारतीय भूमी पत्तन प्राधिकरणाच्या सदस्या रेखा रायकर, तनुजा बापट, प्रफुल्ल पाठक आणि डॉ. प्रमोद लाखे यावेळी उपस्थित होते.
यूपीएससी परिक्षेची तयारी करीत असलेल्या विद्याथ्र्यांना संबोधित करताना राज्यपाल रवी म्हणाले की, ‘मराठी माणसाच्या अंगात देशासाठी काहीही करण्याची तळमळ आणि त्यात स्वत:ला झोकून देण्याची वृत्ती बघायला मिळते. महाराष्ट्राने स्वातंत्र्य चळवळीत सिंहाचा वाटा उचलला होता; आता भारताला जागतिक शक्ती बनविण्याचा विडा उचला’.
राज्यपाल पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याला 2047 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होतील. आयएएस अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे आणि हातात 25 वर्षे आहेत. अशी सुवर्ण संधी जीवनात एकदाच मिळते आणि जी तुम्हाला मिळालेली आहे. याची जाणीव ठेवून कामाला लागा. भारत नेमका कसा आहे? आणि काय आहे? हे आधी समजून घ्या! यासाठी समाजाच्या घटकांशी स्वत:ला जोडून घ्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वाचन करा. त्यांच्या भाषणातून खऱ्या भारताचे दर्शन होईल, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
टॅलेंट आफ महाराष्ट्रा इज फ्यूचर आफ इंडिया— डॉ. मुळे
भारताच्या विकासात महाराष्ट्राने नेहमीच सिंहाची भूमिका निभावली आहे. परंतु, आयएएस, आयपीएस, आयएफएस अशा देशाच्या प्रशासकीय सेवेत मराठी माणसाची भागीदारी अत्यंत कमी आहे. ही दरी भरून काढण्याचा संकल्प देशभरातील मराठी प्रशासकीय अधिका—यांना सोडला आहे. मराठी विद्याथ्र्यांना प्रशासकीय सेवेत येण्यासाठी प्रोत्साहित करणे, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि शेवटपर्यंत हवी ती मदत करणे, या हेतूने ‘पुढचे पाउल’ या संस्थेची स्थापना झाली आहे, असे संस्थापक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मराठी माणूस हा सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेला समर्पित जीवन जगणारा माणूस आहे. महाराष्ट्राची तरूण पिढी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे खरे वारसदार आहेत. एवढेच नव्हे तर, ‘टॅलेंट आफ महाराष्ट्रा इज अ फ्यूचर आफ इंडिया’ असे अभिमानाने सांगताना मुळे यांना गहिवरूण आले.
आणि ओबामा यांनी भेटायला बोलाविलं
प्रशासकीय सेवेत देशाची सेवा करण्याची प्रचंउ संधी उपलब्ध आहे. आयएएस, आयपीएस, आयएफएस अशा कितीतरी विभागांच्या माध्यमातून देशाच्या विकासात भर घालण्याची संधी आपल्याला मिळत असते, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि लोकपाल सदस्य डी. के. जैन यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात मनरेगा या जगातील सर्वात मोठया योजनेवर काम करण्याची संधी मला मिळाली. मी संयुक्त सचिव म्हणून काम करीत होतो. संपूर्ण जगाने या योजनेचे कौतुक केले आहे. एकदा अचानक मला व्हाईट हाउसमधून फोन आला. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना आपणास भेटायचे आहे, असा संदेश मला देण्यात आला. 2014 ची ही गोष्ट. ओबामा भारत भेटीवर आले होते. मी त्यांना भेटायला गेलो. मला फक्त तीन मिनिटे मिळाली. परंतु, हीच तीन मिनिटे यश आणि समाधानाचे शिखर आहे. याची तुलना कोणत्याही अन्य क्षणासोबत केली जावू शकत नाही. अशाप्रकारची कामे आणि अशाप्रकारच्या असंख्य संधी प्रशासकीय सेवेत आहेत. फक्त प्रामाणिकपणा अंगी असायला हवा.
आयएएसची परिक्षा उत्तीर्ण आणि तयारी करणारे सर्व विद्यार्थी खूप नशिबवान आहेत. 2047 पर्यंत भारताला जागतिक शक्ती बनविण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि मी यास मुकलो आहोत, अशी खंतवजा आनंद जैन यांनी बोलून दाखविल.
जय महाराष्ट्र; जय तामिळनाडू
महाराष्ट्राने आम्हाला भरभरून दिले आहे आणि आता समाजाला परत करण्याची वेळ आहे, या भावनेतून देशभरात पसरलेल्या प्रशासकीय अधिका—यांनी ‘पुढचे पाउल’च्या माध्यमातून ‘गिव्हिंग बॅक’ मोहिम सुरू केली आहे, असे मत तामिळनाडूचे राज्यपाल रवी यांचे प्रधान सचिव आनंद पाटील यांनी व्यक्त केले. आम्हाला 2047 पर्यंत तामिळनाडूला प्रथम क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे. केवळ तामिळनाडूच नव्हे तर; भारतातील प्रत्येक राज्याला प्रथम क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे, असे आवाहन करीत आनंद पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र — जय तामिळनाडू’ असा उद्घोष केला आणि डॉ. आंबेडकर सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. मराठी माणूस जगात कुठेही असला तरी ‘जन्मभूमि आणि कर्मभूमि’ त्याच्यासाठी समान असते, हे पाटील यांनी दाखवून दिले.
मला ‘क्वीन व्हिक्टोरिया’ झाल्यासारखं वाटतं!
कोरोनाच्या काळात लोकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा करण्याचे काम आम्हाला करायचे होते. जवळपास दोन लाख कोटी रूपये अकाउंटमध्ये जमा केले गेले. एका ठिकाणी बसून देशाच्या शेवटच्या कोप—यात वसलेल्या माणसाची सेवा करण्याची संधी जेव्हा आपल्याला मिळते आणि त्यात आपण यशस्वी होतो, या आनंदाची आणि समाधानाची तुलना अन्य कोणत्याही गोष्टीसोबत केली जावू शकत नाही. अशावेळेस आपल्याला ब्रिटनची महारानी क्वीन व्हिक्टोरिया झाल्याची अनुभुती होते. प्रशासकीय सेवा ही पावर दाखविण्याची नव्हे तर सेवा करण्याची संधी आहे, असे मत रेखा रायकर यांनी व्यक्त केले.
राज्यपालांचा सल्ला
बचत करा, आरोग्य सांभाळा, अहंकार टाळा, जोडीदार योग्य निवडा, स्वाभीमान जपा, महात्मा गांधी यांचे वाचन करा.
या कार्यक्रमात संदीप शिंदे, प्रशांत बाविस्कर, रणजित यादव, ओंकार शिंदे, अक्षय प्रकाशकर, पवन खाडे, निरंजन सुर्वे, शंतनू मलानी, यश काळे, अर्जित महाजन, विशाल खत्री, रोहन कदम, नितीश डोमळे, स्वप्नील सिसले, अजिंक्य माने, अभिजित पाटील, देवराज पाटील, शुभम भोसले, पद्मभूषण राजगुरू, गिरीष पालवे या सनदी सेवा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
एमपीएससी परीक्षा केंद्र लवकरच दिल्लीत
यूपीएससी परीक्षेची तयारी करायला दिल्लीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. हे विद्यार्थी यूपीएससीसोबतच एमपीएससी परीक्षेची तयारी करीत असतात. परंतू देण्यासाठी त्यांना दिल्ली सोडून महाराष्ट्रात जावे लागते. यात आठवडा वाया जातो. अशात, दिल्लीत एमपीएससीचे परीक्षा केंद्र सुरु करण्याची मागणी पुढचे पाऊलने केली असल्याची माहिती अध्यक्ष प्रफुल्ल पाठक यांनी दिली आहे
माजी सचिव डी के जैन यांनी ही बाब एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या निदर्शनात आणून दिली आहे. एवढेच नव्हे तर, काल मंगळवारी झालेल्या बोर्ड मीटिंगमध्येमांडला गेला. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
जवळपास 3000 विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, असेही पाठक यांनी सांगितले.