आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्यातील अडगाव खुर्द व बोरवा तालुका तेल्हारा येथून तब्बल २३ लक्ष ३६ हजार रुपये किमतीचा गांजा साठवून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करिता असलेल्या दोन आरोपींना आकोट न्यायालयाने बारा वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १ लक्ष 20 हजारांचा द्रव्य दंड आणि द्रव्य दंड न भरल्यास अधिकचे ३ वर्षे कारावासाची शिक्षा फर्मावली असून या प्रकरणातील दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी आहे कि, स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांनी पोलीस निरिक्षक पो.स्टे. आकोट ग्रामीण जि. अकोला यांना लेखी फिर्याद दिली की, दिनांक २३.०९.२०२० रोजी कर्तव्यावर हजर असतांना सकाळी १०.५० वाजता गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की, पो.स्टे. आकोट ग्रामीण हद्दीतील अडगांव खु. येथे राहणारा इसम नामे राजू सोळंके याच्या झोपडीमध्ये वारी हनुमान येथे राहणारा कैलास पवार याने एका मोठ्या पोतडीमध्ये विक्रिकरिता गांजा साठवून ठेवला आहे.
अशा माहिती वरून सर्व कायदेशिर बाबीची पूर्तता करून पोलीस मोठ्या ताफ्यासह दोन पंच, फोटोग्राफर यांना घेऊन वेगवेगळया शासकीय वाहनाने छापा मारण्याकरिता अकोल्याहून रवाना झालेत. आकोटला आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे यांना सोबत घेवून, तसेच कार्यवाहीकरिता इलेक्ट्रीक वजन काटेवाला याला देखील सोबत घेवून छापा कार्यवाही करिता ग्राम अडगांव खु. येथे रवाना झाले. अडगांव खु. येथे मिळालेल्या माहिती प्रमाणे झोपडीसमोर पाहणी केली असता, झोपडीत दोन इसम बसलेले दिसून आलेत.
त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे १. राजु मोतीराम सोळंके वय २४ रा. अडगांव खु. ता. अकोट जि. अकोला, २. कैलास बाजीराव पवार वय ४५ वर्ष रा. वारी हनुमान ता. तेल्हारा जि. अकोला असे सांगितले. या झोपडीची झडती घेतली असता, झोपडीमध्ये किटकॅट प्रिंट असलेले १८ पॅकेट प्लॉस्टीकच्या पन्नीचे मिळून आले. पंचा समक्ष फोडून पाहिले असता, त्यामध्ये गांजा असल्याची पोलीसांची व पंचाची खात्री झाल्याने पंचा समक्ष गांजाचे पॅकेट इलेक्ट्रीक वजन काट्यावर मोजले असता, ओलसर गांजाचे पोत्यांसह एकूण वजन ३९ किलो ज्याची किंमत ६ लाख २४ हजार आहे.
पंचा समक्ष जप्त करून हा गांजा ताब्यात घेतला. राजू सोळंके याने हा गांजा कैलास बाजीराव पवार यांच्या मालकीचा आहे असे सांगितले व कैलास बाजीराव पवार याने पोलीसांना सांगितले की, माझा साथीदार शत्रुघ्न भाउलाल चव्हाण रा. बोरव्हा ता. तेल्हारा जि. अकोला असे आम्ही दोघे अवैध गांजा विक्रिचा व्यवसाय करतो. या माहिती वरून पोलीस ताफा ग्राम. बोरव्हा येथे शत्रुघ्न चव्हाण याच्या घरी गेले असता, त्याच्या घरामध्ये देखील १०७.९ कि.ग्रा. गांजा ज्याची एकूण किंमत १७ लाख १२ हजार रूपये जप्त करण्यात आला. सदर कार्यवाहीमध्ये एकूण गांजाचे वजन १४६ किलो नउशे ग्राम ज्याची एकूण किंमत २३ लाख ३६ हजार रूपये आहे. तो होलसेल गांजा जप्त करून ताब्यात घेतला.
या लेखी फिर्यादीवरून आरोपी विरूध्द एनडीपीएस कलम ८ (अ) (३), २० (ब) (२) (क) प्रमाणे आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली व तपास अधिकारी यांनी सर्व आरोपींना अटक करून दोषारोपत्र वरील कलमांप्रमाणे पीएसआय सागर हटवार यांनी दाखल केले.
या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी एकूण ८ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयामध्ये नोंदविल्यात. या प्रकरणात आयशर ट्रक क्रमांक एमएच ३० बीडी २२४६ याचा मालक प्रफुल्ल भोपळे याला देखील आरोपी म्हणून नमूद केले होते. कारण याच्या ट्रकमधूनच परराज्यामधून गांजा आकोट तालुक्यात आणला होता.
या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी शिक्षेसंबंधी न्यायालयात युक्तीवाद केला की, इतर गुन्हयांच्या परिणामापेक्षा अंमली पदार्थाचा गुन्हा हा समाज विघातक गुन्हा आहे. अमली पदार्थामुळे तरूण पिढीचे फार मोठे नुकसान होते. त्यामुळे आरोपींना कुठल्याही प्रकारची दया न दाखवता जास्तीत जास्त सश्रम कारावासाची शिक्षा देण्याची विनंती सरकार तर्फे करण्यात आली. तर आरोपी तर्फे एम.बी. शर्मा, अॅड. दिलदार खान, अॅड. मनोज वर्मा यांनी कामकाज पाहिले.
कोर्ट पैरवी म्हणून पोकॉ. संतोष म्हात्रे यांनी ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनास काम पाहिले. तर या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांनी तपास केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपींना वरील प्रमाणे १२ वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा प्रत्येकी १ लाख २० हजार रूपये दंडासह ठोठावली. विधीज्ञ मनोज वर्मा यांनी युक्तिवाद केलेले आरोपी प्रफुल्ल उर्फ बाळू भोपळे आणि शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली