आकोट – संजय आठवले
आकोट बाजार समिती पंचवार्षिक संचालक निवडणुकीत एकूण १९११ मतदारांपैकी १८५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून त्यामध्ये सेवा सहकारी सोसायटीचे ९७.६७ प्रतिशत, ग्रामपंचायतचे ९५.८८ प्रतिशत तर हमाल मापारी यांचे ९८ प्रतिशत मतदान नोंदविण्यात आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी उद्या दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पासून नगरपरिषद शाळा क्रमांक ७ येथे होणार आहे.
आकोट तालुका बाजार समिती निवडणुकीच्या इतिहासात यावेळी प्रथमच चार पॅनल्स निवडणूक रिंगणात उतरले होते. कधी नव्हे ती यावेळी ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून पहिल्यांदाच या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. वाढलेल्या या टक्केवारीनेच या निवडणुकीतील सुरस निदर्शनास आली आहे. मतदानात वाढ झालेल्या टक्केवारीने काही लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
तर अनेकांच्या हृदयांचे ठोके वाढू लागले आहेत. त्यामुळे आजची रात्र या दोन्ही प्रकारच्या लोकांकरिता कठीण परीक्षेची ठरणार आहे. या निवडणुकीत चारही पॅनल्स मधून आवर्जून युवा मतदारांना लढतीत उतरविल्या गेले होते. त्यामुळे प्रचारादरम्यान साऱ्याच पॅनलने प्रत्येक मतदाराशी प्रत्यक्ष संपर्क साधलेला आहे. यासोबत प्रत्येक उमेदवाराने आपापल्या व्यक्तिगत प्रभावाचाही या निवडणुकीत उपयोग करवून घेतलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच प्रमाणात क्रॉस वोटिंग झाले आहे.
त्याने काही प्रभावशाली असलेल्या मोजक्या लोकांच्या विजयाची खात्री दिल्या जात आहे. कधी नव्हे तो यावेळी मतदारांनी आपल्या मतांचा थांड लागू न दिल्याने कोणते पॅनल बहुमतात येईल याचा भरवसा दिल्या जाऊ शकत नाही. प्रत्येकाची कुवत समजण्याकरिता आता प्रत्यक्ष मतमोजणी पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या निवडणुकीत मतांचा हक्क बजावण्याकरिता सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघाकरिता २, ग्रामपंचायत करिता २ आणि हमाल व मापारी यांचेकरिता १ असे एकूण ५ कक्ष ठेवण्यात आले होते. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात एकूण ७३१ मतदार होते. त्यापैकी ७१४ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्याची टक्केवारी ९७.६७ इतकी झाली. ग्रामपंचायत मतदार संघात एकूण ७२८ मतदार होते. त्यातील ६९९ म्हणजे ९५.८८ प्रतिशत मतदारांनी आपला हक्क बजावला.
हमाल व्यापारी मतदारसंघात एकूण ४५१ पैकी ४४२ म्हणजे ९८ प्रतिशत इतके सर्वाधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. या मतदारसंघातही कमालीची चुरस बघावयास मिळाली. परंतु या मतदारसंघात कोणत्याही पॅनलने उमेदवार दिला नसून या मतदारसंघात पाचही उमेदवारांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.
यासोबतच या निवडणुकीपूर्वीच व्यापारी व आडत्ये या मतदारसंघातून रितेश अग्रवाल आणि सुनील गावंडे हे दोन उमेदवार अविरोध विजय झालेले आहेत. हे दोघे आणि हमाल व्यापारी मतदारसंघातील एक असे हे तीन उमेदवार कोणत्याही पॅनलचे नाहीत. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत या तिघांच्या मताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे आतापासूनच या तीनही लोकांचे भाव वधारलेले आहेत.