महेंद्र गायकवाड
नांदेड
नदी-नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी राज्य शासनाने तातडीने जिल्हानिहाय कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.
प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्न उपस्थित करताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, राज्यभरात पूर परिस्थिती निर्माण होण्यास नदी-नाल्यांमधील गाळ हे प्रमुख कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. गाळ साचल्याने पुरक्षेत्रात वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा गाळ काढण्याची घोषणा केली असली अद्याप त्याबाबत शासननिर्णय काढण्यात आलेला नाही. या विषयाची निकड लक्षात घेता राज्य शासनाने तातडीने जिल्हानिहाय कार्यक्रम निश्चित करावा आणि निधीची तरतूद करून शासननिर्णय काढावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
अतिवृष्टी व पुरामुळे वीज पुरवठा यंत्रणेच्या झालेल्या नुकसानावर बोलताना ते म्हणाले की, डीपी खराब होणे, तारा तुटणे, खांब पडणे या बाबी नेहमीच घडत असतात. तुटलेल्या तारा आणि पडलेल्या खांबाचा विषय आमदारांना थेट विधानसभेत मांडावा, हे आश्चर्चकारक आहे. खरे तर हा विषय विधानसभेत यायलाच नको. संबंधित यंत्रणेने तातडीने आवश्यक पावले उचलून वीजग्राहकांना दिलासा दिला पाहिजे. परंतु, तसे होत नाही व या कामांसाठी आमदारांना रोज फोन येत असतात. अशा कामांबाबत संबंधित यंत्रणेने किती काळात प्रतिसाद द्यावा, हे निश्चित केले पाहिजे, असे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
वीज पुरवठा दुरूस्ती ही कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फतही निधी दिला जातो. मात्र सध्या या समितीच्या सर्व निर्णयांवर स्थगिती असल्याने ही कामे होताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीने अत्यावश्यक सेवांबाबत घेतलेल्या निर्णयांवरील स्थगिती राज्य शासनाने उठवावी; जेणेकरून वीज पुरवठ्यामधील लहान-लहान अडचणी स्थानिक स्तरावरच मार्गी लागतील, असेही चव्हाण म्हणाले.